
दिनांक: २२ एप्रिल २०२५
पेडणे (प्रतिनिधि):ज्याची पूजा केली जाते, जो जे उपदेश करतो ते आचरणात आणतो. तोच यशाची शिखरे गाठतो. आत्मनिर्भर समाज होण्यासाठी स्वतः विकसित होणे काळाची गरज आहे. एकंदर योग्य व सुदृढ राहण्यासाठी आरोग्य सांभाळणे महत्वाचे असून, शिक्षण, ग्रामविकास, शेती आणि वारसा हे जपले तरच ते शक्य आहे. आपल्या वात्सल्य जबाबदाऱ्या ओळखणे म्हणजेच आई वडिलांची सेवा होय. माणसाने यासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी प्रयत्न करा व निरागस जीवन जगा असा संदेश कोरगाव येथे आयोजित सत्संग समारंभात पूज्यश्री अद्रुश्य कढसिद्धेश्वर स्वामीजींनी मार्गदर्शन करताना दिला.
कोरगाव येथे अखिल गोवा काडसिधेश्वर संप्रदाय कोरगाव आयोजित सत्संग कार्यक्रम आयोजित केला होता. स्वामीजींचे श्री कमलेश्वर संस्थानात आगमन झाले तेंव्हा दिंडीने त्यांचे स्वागत केले. आगमना नंतर पाद्यपूजा व दासबोध वाचन झाले. पुढे स्वामींनी प्रवचन दिले. तद्नंतर कोरगाव गावातील नामवंत अशा विविध क्षेत्रात ज्यांनी नाव कमावले व आपला एक वेगळा ठसा उमटविला अशा एकूण ६ मान्यवरांचा गौरव करण्यात आला. ज्यात श्री कमलेश्वर मंदिराचे पुजारी श्री गुरुनाथ गुरव, कोरगावचे माजी सरपंच श्री सुदीप कोरगावकर, कोरगावस्थीत मात्र आता दाबोळी येथे शिक्षण संस्था चालवणारे श्री पांडुरंग कोरगावकर, पेठचावाडा कोरगाव येथील मात्र डिचोली येथे इंटिरिअर डिझाइन मध्ये आपला वेगळा ठसा उमटविला असे श्री दत्ताराम शेटये, पेठेचावाडा येथील कोरगावचे माजी सरपंच, पेडणे व्हायकाऊंट हायस्कूलचे शिक्षक, चित्रकार, आणि साहित्यिक श्री राजमोहन शेटये तसेच काडसिद्धेश्वर संप्रदायाचे मूळ कोरगाव व सध्या वास्को येथे राहणारे श्री भगवान हरमलकर यांचा स्वामी पूज्यश्री अदृश्य काडसिध्येश्वर महाराज यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम कोरगाव येथे आयोजित करण्यास या संप्रदायाचे पूजक श्री आनंद शेटये आणि श्री भगवान हरमलकर यांचा मोठा वाटा होता. गोव्यातील अनेक अशा भक्त मंडळींनी यानिमित्त कोरगाव येथे उपस्थिती लावून कार्यक्रम यशस्वी केला. दोन हजार च्या आस पास या सांप्रदायाचे भक्त गण उपस्थिती होते. भजन व तद्नंतर महाभोजन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.