
(गोवा) : हरमल प्रतिनिधि
दिनांक: १७ ऑगस्ट २०२४
आज नविन पिढीच्या तरुणाईत वाईट सवयी स्वीकारत असून त्याच्या जीवनात चांगल्या सवयींचा ऱ्हास होताना दिसत आहे. त्यामूळे तरुणाईचे गुन्ह्याचे प्रमाण वाढले आहे. ड्रग्स, दारू, तंबाखू व अन्य व्यसनांच्या वाईट सवयी पासून त्यांना परारुत्त करणे हे काळाची गरज आहे. वाईट सवय लागल्यास माणसाचे जीवन उध्वस्त होऊ शकते हे त्यांच्या निदर्शनास आणून देणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन डॉ. जोसेफ फर्नांडिस यांनी केरी येते व्यासपीठावरून केले.
शालेय मुलांमध्ये ड्रग्स दुरव्यवहाराविषयी जागृती करण्यासाठी न्यू इंग्लिश हायस्कुल आणि केरी आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने केरी हायस्कुल सभागृहात डॉ जोसेफ फर्नांडिस यांचे व्याख्यान आयोजित केले होते.
याप्रसंगी व्यासपीठावर त्यांच्यासोबत शाळेचे मुख्याध्यापक भावार्थ मांद्रेकर, यशवंत पेडणेकर, गुरुप्रसाद तांडेल, वैशाली न्हानजी उपस्थित होते.
डॉ फर्नांडिस पुढे बोलताना म्हणाले की, वयात येणाऱ्या मुलांचे स्वतंत्र प्रश्न असतात. समाजातील बदलत्या, आभासी जीवनशैलीचे त्यांना आकर्षण असते. त्यातून त्यांच्या गरजा आणि अपेक्षा वाढतात. अहंकार आणि क्रोध भावनाही वाढीस लागतात. अशावेळी चांगल्या गोष्टींची त्यांना लाज वाटते. पौष्टिक आहारा ऐवजी त्यांना जंक, फास्ट फूड आवडते. कुटुंबा पेक्षा मित्र मैत्रिणी जवळच्या वाटतात. गतिमान जीवन आवडते. अशा मुलांनी भविष्याचा विचार करून सामंजस्याने वागावे.
गोव्यातील बहुतांश वस्ती समुद्र किनारी भागात राहते, लोकांचे राहणीमान वाढले , गरजा वाढल्या,
तसेच विविध प्रकारची व्यसने प्रत्येकाच्या दारात उभी आहेत. झटपट पैसा कमवण्याच्या मोहात कित्येक जीवनांची डोळ्यादेखत राखरांगोळी होताना आपण पाहतो. त्यासाठी मुलांनी वेळीच सावध व्हावे. आपल्या पालकांचे एकून स्वतःचे जीवन सुधारावे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी विधायक कामात स्वतःला व्यस्त ठेवणे हाच उत्कृष्ट मार्ग आहे याची प्रत्येक तरुणांनी जाणीव ठेवावी. स्वतःचे ध्येय ठरवा, त्यावर लक्ष केंद्रित करा व जीवनात यशस्वी व्हा असा जीवन मंत्र शेवटी डॉ फर्नांडिस यांनी मुलांना दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यशवंत पेडणेकर यांनी केले. त्यानंतर शालेय मुलांनी केरी गावांत ड्रग्स जागृती विषयक फेरी काढली.

