
दिनांक:०९/११/२०२६
बांदा/प्रतिनिधी
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश इंगळे यांनी बांदा येथील पत्रकार नीलेश मोरजकर यांचा स्वामींचे कृपावस्त्र व प्रसाद देऊन सन्मान केला.
यावेळी श्री स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा बांदा नट वाचनालयाचे उपाध्यक्ष असलेल्या पत्रकार मोरजकर यांनी इंगळे यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी महेश इंगळे हे आपल्या प्रभागातून सलग पाचव्यांदा विक्रमी मताधिक्याने नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल पत्रकार नीलेश मोरजकर यांच्या हस्ते त्यांचा शाल देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सातत्यपूर्ण जनसंपर्क, लोकाभिमुख कार्यशैली आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाच्या जोरावर इंगळे यांनी जनतेचा विश्वास संपादन केला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मोरजकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी पत्रकार नीलेश मोरजकर यांनी महेश इंगळे यांना कोकणातील निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि सांस्कृतिक परंपरेने समृद्ध असलेल्या बांदा तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणाचा स्वीकार करत इंगळे यांनी कोकण भेटीबाबत सकारात्मक भावना व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना महेश इंगळे यांनी पत्रकार नीलेश मोरजकर व त्यांच्या सहकाऱ्यांचा श्री स्वामी समर्थ महाराजांचे कृपावस्त्र आणि प्रसाद देऊन देवस्थान समितीतर्फे सन्मान केला. श्री स्वामी समर्थांच्या पवित्र सान्निध्यात झालेल्या या स्नेहपूर्ण भेटीमुळे उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.
यावेळी शिवसेना युवासेना तालुकाप्रमुख रियाज खान, ओंकार फाऊंडेशनचे अध्यक्ष गुणेश गवस, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान काळसेकर आदी उपस्थित होते. धार्मिक श्रद्धा, सामाजिक बांधिलकी आणि परस्पर स्नेहभाव जपणारा हा भेटीचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
