(गोवा) पेडणे :प्रतिनिधि
७ ऑगस्ट २०२४
कृष्णा पालयेकर यांनी गोवा विद्यापीठाच्या एम.ए च्या परीक्षेत गोवा राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त करून समस्त पेडणेवासियांची मान अभिमानाने उंचावलेली आहे. कृष्णा पालेकर यांचे कार्य सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात खूप जोमाने सुरू आहे. कोरोना काळात सामाजिक बांधिलकी जपत आपला जीव धोक्यात घालून त्याने केलेली लोकांना मदत ही सर्वश्रुत आहे. कृष्णा पालयेकर यांची समाजाप्रती असलेली तळमळ व कुठलाच भेदभाव न करता आपण जगत असताना दुसऱ्यांना जगवणे या कर्तव्यापोटी कृष्णा पालयेकर यांचे कार्य सुरू आहे. सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असताना त्यांनी अथक परिश्रमाने शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा आपली वेगळी चमक दाखवलेली आहे, त्यामुळे त्यांचे हे यश आम्हा पेडणेवासियांसाठी अभिमानास्पद आहे, असे प्रतिपादन चांदेल हसापूर ग्रामपंचायतीचे सरपंच तथा समाजसेवक तुळशीदास गावस यांनी केले.
गोवा विद्यापीठाच्या एम. ए च्या परीक्षेत मराठी विषयात गोवा राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल फुले- शाहू- आंबेडकर प्रतिष्ठान पेडणे यांच्यातर्फे कृष्णा पालयेकर यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने तुळशीदास गावस बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत पेडणे नगरपालिकेचे नगराध्यक्ष शिवराम तुकोजी, धारगळचे माजी सरपंच तथा विद्यमान पंच भूषण नाईक, उद्योजक रुद्रेश नागवेकर, अन्न व पुरवठा खात्याचे सहाय्यक अधिकारी योगेश तळवणेकर, फुले -शाहू -आंबेडकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव गवंडी उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की, माणसाकडे ध्येय, चिकाटी आणि इच्छाशक्ती असली की अशक्य गोष्ट ही शक्य करता येते आणि तशाच पद्धतीने अथक परिश्रमातून कृष्णा पालयेकर यांनी हे यश संपादन केलेले आहे. त्यांनी नवचेतना युवक संघाच्या वतीने अनेक प्रकारचे विविधांगी कार्यक्रम व उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये तसेच युवकांमध्ये जागृती करण्याचे मोलाचे काम केले आहे. आजचा विद्यार्थी हा शिक्षण घेत असतानाच आपण समाजाचे देणे लागतो या कर्तव्य भावनेतून समाजात अग्रेसर राहावा, या उद्देशाने कृष्णा पालयेकर यांचे मोलाचे काम असल्याचे त्यांनी सांगितले.
[] यावेळी कृष्णा पालयेकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा गौरव आपला एकट्याचा नसून प्राथमिक शिक्षणापासून ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंत ज्या ज्या शिक्षकांनी शिक्षण दिले त्या सर्व शिक्षकांचा सन्मान आहे. त्याबरोबरच आपल्या जडणघडणीत ज्यांचा मोठा खारीचा वाटा आहे ते आपले काका मेघश्याम पालयेकर यांना आपण हा गौरव समर्पित करत आहे. गोवा राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याबद्दल फुले -शाहू -आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे पाठीवर शाब्बासकीची थाप देत आपली जबाबदारी त्यांनी वाढवलेली आहे. त्याबरोबरच या संस्थेचे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य चालू आहे. ह्या गौरव कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मान्यवरांमध्ये पेडणे तालुका ध्येयाने विकसित व्हावा यासाठी लागणारी जी ताकद आणि क्षमता पाहिजे ती या लोकांमध्ये आहे असे सांगून त्यांनी गौरव केल्याबद्दल आभार व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक महादेव गवंडी यांनी केले. योगेश तळवणेकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.