
दिनांक: ०६/०२/२०२६
दोडामार्ग:पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आ. दीपकभाई केसरकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेत दोडामार्ग बाजारपेठेत प्रभावी पथनाट्य सादर केले. लोकशाही प्रक्रियेत प्रत्येक मतदाराचा सहभाग महत्त्वाचा असल्याचा संदेश या पथनाट्यातून अत्यंत प्रभावीपणे देण्यात आला.
सादर करण्यात आलेल्या पथनाट्यातून मतदानाचे महत्त्व, मत न देण्यामुळे होणारे परिणाम, पैशाला किंवा प्रलोभनांना बळी न पडता योग्य व प्रामाणिक उमेदवाराची निवड करण्याची गरज यावर प्रकाश टाकण्यात आला. विद्यार्थ्यांनी आपल्या अभिनय, संवादफेक व प्रभावी सादरीकरणातून नागरिकांचे लक्ष वेधून घेत लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचा संदेश दिला.
दोडामार्ग बाजारपेठेत मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले. युवक-युवतींनी समाजात मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी घेतलेला हा पुढाकार स्तुत्य असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. विशेषतः प्रथमच मतदान करणाऱ्या युवकांसाठी हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरल्याचेही अनेकांनी सांगितले.
या उपक्रमामुळे बाजारपेठ परिसरात काही काळ उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी नागरिकांना “मतदान करा, लोकशाही वाचवा”, “एक मत देशाचे भविष्य घडवते” असे घोषवाक्य देत मतदानासाठी प्रेरित केले. उपस्थित नागरिकांनीही या संदेशाला सकारात्मक प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावण्याचा निर्धार व्यक्त केला.
पथनाट्यसाठी मार्गदर्शन विभाग प्रमुख प्रा. एम. एस. पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचारीवर्ग, विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजात लोकशाही मूल्ये रुजविण्यासाठी अशा प्रकारचे जनजागृती उपक्रम अत्यंत गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
