आताच शेअर करा

दिनांक: १५/०८/२०२६

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात औद्योगिक प्रकल्पांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा व या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढावे हे स्वप्न काही वर्षांपूर्वी माजी मुख्यमंत्री व या जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे साहेब यांनी पाहिले. ते स्वप्न प्रत्यक्ष साकार करण्याचे काम पालकमंत्री म्हणून मी सुरू केले आहे. त्याचीच मुहूर्तमेढ आज रोवली जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला एक नवी दिशा देणाऱ्या आणि रोजगाराच्या विपुल संधी निर्माण करणाऱ्या ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या माध्यमातून २०० बोटी बनवण्याचं काम तळवणे गावात होणार असून स्थानिक २०० युवक-युवतींना याच  भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. रिव्हर्स माइग्रेशनची ही सुरूवात असून आरोंदा जेरी व रेडी बंदर तसेच ताज पंचतारांकित प्रकल्प देखील लवकरच मार्गी लागणार असून आता विरोधाला थारा न देता येथील लोकांनी विकासाची सवय लावून घे आशावादी होऊन विकासाला साथ द्यावी, असे आवाहन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले.
     सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’ च्या भव्य जहाज बांधणी प्रकल्पाच्या जहाज बांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी ते बोलत होते.
    ते म्हणाले,  सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्या नकाशावर आणण्याचे काम नारायण राणेंनी केलं. त्यामुळे आज या प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी त्यांना आणण्याचा मानस होता. मात्र, त्यांच्या हस्ते भूमिपूजन न करता या प्रकल्पाच्या पहिल्या बोटीच्या शुभारंभाला त्यांना इथे घेऊन यायचं आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.
      राज्यात काहीजण या जिल्ह्याबद्दल काहीही माहिती नसताना जमीन व्यवहारावरून जिल्ह्याची प्रतिमा खराब करण्याचे काम करत आहेत. मात्र, त्यांना उत्तर देत न बसता कामातून उत्तर देण्याचा निश्चय मी केला आहे‌. खा. नारायण राणे यांनी अनेक प्रकल्प जिल्ह्यात आणले. त्यातील चिपी विमानतळ, मुंबई गोवा महामार्ग यासारखे महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास गेले तर सी वर्ल्ड व अन्य प्रकल्प विरोधासाठी विरोध झाल्याने अपूर्ण राहिले. त्यामुळे जेव्हा पालकमंत्री झालो तेव्हाच येथील लोकांसाठी जिल्ह्यातच रोजगार उत्पन्न करून देण्याचा निर्धार केला. आतापर्यंत आपली मूलं गोव्यात जात होती. मात्र, आज गोव्यातील कंपनी महाराष्ट्रात आणण्याचं काम आम्ही केल आहे. गोवा, कर्नाटकपेक्षा मोठी गुंतवणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यात करण्याचा शब्द त्यांनी दिला असून महाराष्ट्र सरकारकडून त्यांना संपूर्ण सहकार्य दिलं जाईल, असा विश्वास त्यांनी त्यानिमित्ताने व्यक्त केला.
      या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरुवातीला २०० बोटी बनविण्याचे काम इथे होणार असून मुंबईतील वॉटर मेट्रो या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी बोटी बनवण्याच काम हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे‌‌. चायना टेक्नॉलॉजीचा वापर ते करणार आहेत. कारखाना उभारणीनंतर दीड ते दोन महिन्यात पहिली बोट तयार होणार असून २०० स्थानिक तरूण-तरूणींना रोजगार देण्याच काम इथे होणार आहे. कुशल कामगारांबरोबरच कुशल कारागीर बनविण्यासाठी येथील युवकांना ट्रेनिंग सेंटर देखील उभारले जाणार आहे. त्यामुळे युवापिढीने आता भुलथापांना बळी पडू नये न पडता या प्रकल्पाच्या माध्यमातून आपल्याला कसा रोजगार मिळेल व त्यासाठी काय करायला हवं त्याचा अभ्यास करावा असे आवाहन देखील त्यांनी केले.
     दरम्यान, पर्यावरण पुरक प्रकल्प हवे म्हणून आंदोलन करणारे लोक आज कुठे दिसत नाहीत‌. अशा प्रकल्पांचे स्वागत करत सरकाराला साथ का देत नाहीत असा सवाल उपस्थित करत लोकांनी आता अशा लोकांचे चेहरे ओळखणे आवश्यक आहे. ही फक्त सुरूवात असून सावंतवाडीतून ती केली आहे. तर आरोंदा जेटीच्या उद्घाटनासाठी लवकरच सर्वांना याव लागणार आहे. त्यामुळे पर्यटन, जलवाहतूकीची दालन खुली होणार आहेत. खासदार नारायण राणे यांनी काही वर्षांपूर्वी सुरुवात केलेले व सद्यस्थितीत बंद असलेलं रेडी बंदर सुरू करण्यासाठी मी पुढाकार घेतला असून १०० टक्के क्षमतेवर ते सुरु करण्याचा विश्वास यानिमित्ताने देतो. तसेच देवगड बंदर देखील सुरू होणार असून जिल्ह्यातील दोन टोकावरील या बंदरांमुळे गुजरातप्रमाणे इथलाही विकास होईल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
     ताज पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प लवकरच मुख्यमंत्र्यांकडून जाहीर होऊन शिरोडा वेळागर येथे हा प्रकल्प साकार होणार आहे‌. तसेच दोडामार्गातही अडाळी एमआयडीसीच्या माध्यमातून अनेक उद्योगधंदे येणार आहेत. या सर्व  उद्योगांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल असा आशावाद व्यक्त करत नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा, विकासाला साथ द्या. येथील युवकांना रोजगार कसा मिळेल यावर अधिक भर द्या, विकासाची सवय आता लावून घ्या, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.
      दरम्यान या प्रकल्पासाठी सकारात्मक प्रतिसाद देणाऱ्या झोया मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक जॉन फर्नांडिस,
सुरज देवारीया तसेच प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करून देणारे डॉ. निलेश बाणावलीकर यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. या ठिकाणी प्रकल्प आणण्यासाठी त्यांना राजी करणे एवढे सोपे नव्हते. मात्र आता सर्वाधिक गुंतवणूक ते इथे करत आहेत त्यामुळे प्रकल्प मार्गी लागण्यासाठी व कायम सुरू राहण्यासाठी स्थानिकांनी सहकार्य करावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
     याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार राजन तेली यांनी मनोगत व्यक्त केली. माजी सभापती संदीप नेमळेकर यांनी सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात प्रकल्प आणल्याबद्दल ऋण व्यक्त केले.
      झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडच्यावतीने या ऐतिहासिक आणि औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्यास मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, माजी आमदार राजन तेली, झोया मरीनचे संचालक जॉन फर्नांडिस, सुरज देवारीया, डॉ. निलेश बाणवलीकर, युवराज लखमराजे भोंसले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष काका कुडाळकर, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक,जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सातोसकर, माजी जिल्हा परिषद सदस्या शर्वाणी गावकर, माजी उप सभापती संदीप नेमळेकर, पंचायत समिती सदस्या स्नेहा कांबळे, तळवणे सरपंच गोविंद केरकर, उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, शेखर गावकर, सिद्धेश कांबळी आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी, तळवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे संचालक जॉन फर्नांडिस यांनी केले. सूत्रसंचालन निलेश पवार यांनी तर आभार मेरिटाईम बोर्डचे अधिक्षक अभियंता श्री. देवरे यांनी आभार मानले.

*सावंतवाडीला प्रकल्प दिल्याबद्दल ऋणी : प्रमोद कामत*
स्वातंत्र्य दिनी भूमिपूजन झालेल्या या प्रकल्पामुळे आजचा आनंद द्विगुणित झाला आहे. या प्रकल्पामुळे तळवणे गाव देशात पोहणार असून विकासकामात सहकार्याची अपेक्षा आहे. लोकांनी या प्रकल्पाला सहकार्य केल्यास इतर प्रकल्पही जिल्ह्यात येतील. सावंतवाडी तालुक्यास हा प्रकल्प दिल्याबद्दल ऋण व्यक्त करतो असं मत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी व्यक्त केले.‌

*सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा क्षण : मनिष दळवी*
जिल्ह्यातील सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा हा क्षण आहे. नारायण राणे यांनी जिल्ह्याच्या विकाससाच स्वप्न पाहिले. अनेक प्रकल्प साकार झाले काहींनी विरोध केल्याने काही रखडले. मात्र, हे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी नितेश राणे यांनी घेतली असून जिल्ह्यातील स्थलांतर रोखण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. हजारो तरूणांच्या काम देण्याच कार्य ते करुन दाखवतील. पालकमंत्री झाल्यानंतर पहिला प्रकल्प सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ दिल्याबद्दल धन्यवाद देतो असे उद्गार जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींनी काढले.


*पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी : राजन तेली*

संत्री नितेश राणे यांच्या
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास खात्यातून रोजगाराच्या नवनवीन संधी इथे आता उपलब्ध होत आहेत. ते लवकरच गोवा लगतच्या महाराष्ट्रातील समुद्र किनारपट्टीच्या तालुक्यात देखील रोजगार निर्माण करतील तसेच लवकरच आरोंदा जेटी देखील सुरू होईल, असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *