
दिनांक: १५/०८/२०२६
सावंतवाडी : न्हावेली येथील गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचा गुरु अभिवादन सोहळा रविवार, १६ ऑगस्ट रोजी श्री भगवती हॉल, मळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. संगीत क्षेत्रातील गुरुजनांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने आयोजित या सोहळ्यात विविध सांगीतिक कार्यक्रम सादर होणार आहेत.
या सोहळ्याला सावंतवाडी संस्थांनचे राजगुरू तथा तळवणे मठाधिपती राजेंद्रस्वामी भारती महाराज यांचे आशीर्वाद लाभणार आहेत, तसेच या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उदघाटक म्हणून उपजिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, विशेष अतिथी महाराष्ट्र महसूल व वन मंत्रालय उपसचिव शांतराम कुदळे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) शारदा पोवार, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) प्रतिभा बराळे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) आरती देसाई, सावंतवाडी उपविभागीय अधिकारी वीरसिंह वसावे उपस्थित राहणार आहेत.
गुरु अभिवादन सोहळ्यानिमित्त सकाळी ९.३० वाजता मान्यवरांच्या हस्ते उदघाटन समारंभ पार पडणार आहे. त्यानंतर १०.०० वाजता गुरुकुल संगीतशिक्षण संस्थेचे विद्यार्थी जय जगदीश हरे प्रार्थना सादर करणार आहेत. १०.३० ते १२.०० वाजता विद्यालयातील विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन, १२.०० ते १२.३० वाजता गुरुवर्य भावेश राणे यांच्या विद्यार्थ्यांची पखवाज जुगलबंदी, १२.३० ते १.०० वाजता संगीत अलंकार गुरुवर्य दिप्तेश मेस्त्री यांचे सुश्राव्य गायन सादर होणार आहे. दुपारी १.०० ते २.०० वाजता स्नेहभोजन, २.०० ते ४.०० वाजता विद्यार्थ्यांचे सुश्राव्य भजन गायन, सायंकाळी ४.०० वाजता या कार्यक्रमाचा मुख्य केंद्रबिंदू असलेला गुरुपूजन सोहळा पार पडणार आहे. ५.३० वाजता विद्यालयातील ज्येष्ठ विद्यार्थ्यांचे भैरवी गायन आणि सांगता आदी कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. विद्यार्थी, संगीतप्रेमी, पालक व हितचिंतकांनी या मंगल सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन गुरुकुल संगीत शिक्षण संस्थेचे संचालक गुरुवर्य दिप्तेश मेस्त्री यांनी केले आहे.
