
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर
दिनांक: २७ मे २०२५
मिशन सिंदूर यशस्वी केलेल्या दोन रणरागिनींप्रमाणे मुलींनी देखील मागे न राहता निर्भयपणे पुढे जा, तुमच्यातील धमक जगाला दाखवून द्या, आयुष्यात आकाशाला गवसणी घालताना या मातीला, तुमच्या शाळेला विसरू नका. आपण समाजात राहतो, त्या समाजाचं देणं लागतो याचे भान ठेवा’ अशा शब्दांत कळणे गावचे माजी सैनिक श्री. मनोहर फक्रोजी देसाई यांनी आपले विचार व्यक्त केले. माध्यमिक विद्यालय डेगवे येथे आयोजित गुणगौरव सोहळ्यात ते बोलत होते.
सोमवार दिनांक 26 मे रोजी श्री देव स्थापेश्वर विद्याविकास मंचच्या वतीने माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेत मार्च 2025 परीक्षेतील दहावीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे कळणे गावचे माजी सैनिक श्री. मनोहर फक्रोजी देसाई, डेगवे गावचे माजी सैनिक श्री रामा सहदेव देसाई, श्री गंगाराम अशोक देसाई, माजी शिक्षिका तथा डेगवे गावच्या माजी सरपंच सौ वैदेही रामा देसाई, प्रशाळेचे माजी शिक्षक श्री. प्रभाकर तेली, प्रशालेचे माजी प्रयोगशाळा सहाय्यक श्री. उत्तम देसाई, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री संजय सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, शारदा मातेच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. मार्च 2025 च्या दहावीच्या परीक्षेत प्रथम तीन क्रमांकानी उत्तीर्ण झालेल्या कु. गायत्री विवेकानंद केसरकर, कु. रिया रवींद्र शिंदे, कु. नेहा उदय कदम व कु. शर्वरी काशिनाथ ठाकूर या विद्यार्थ्यांना मंचतर्फे रोख रक्कम तसेच गुणपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रशालेत दर शनिवारी घेतल्या जाणाऱ्या ‘हॅपी सॅटर्डे ‘ उपक्रमासाठी मंचतर्फे बुद्धिबळाचे खेळाचे साहित्य प्रशालेला भेट दिले.
‘खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळावी, त्यांना शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ मिळावं, त्यांच्यातील सुप्त गुणांना करिअर च्या दृष्टीने योग्य मार्ग मिळावा, विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा, नोकरीच्या संधी याबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे या हेतूने श्री देव स्थापेश्वर विद्याविकास मंचची स्थापना केली आहे, माजी विद्यार्थ्यांनी समजभान राखून या शैक्षणिक कार्यात हातभार लावावा, गरजू आजी माजी विद्यार्थ्यांनी तुमच्या शैक्षणिक, करिअर संदर्भात मदतीची गरज असेल तेव्हा निसंकोचपणे या मंचकडे यावे, तुम्हा विद्यार्थ्यांना नेहमीच सहकार्य मिळेल, आपल्या पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांपर्यंत हा निरोप पोहोचू द्या, हा शैक्षणिक प्रगतीसाठी निर्मिलेला कलश नेहमीच अक्षय ठेवा असे आवाहन या वेळी प्रशालेचे माजी शिक्षक श्री. प्रभाकर तेली यांनी उपस्थितांना केले.
प्रशालेचे माजी विद्यार्थी मनोज देसाई यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रिना मोरजकर, प्रास्ताविक श्री. रामचंद्र वरक, तर आभार प्रदर्शन सौ. वीणा देसाई यांनी केले. या कार्यक्रमासाठी माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
