आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर

दिनांक: २७ मे २०२५

राज्यात क्रीडा-कला,संगीत, कार्यानुभव-आयसीटी या विषयांच्या शिक्षक पदांना नऊ वर्षे संचमान्यता नव्हती. त्यामुळे राज्यातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या पुरेशा प्रमाणात असून देखील केवळ संचमान्यतेत पद उपलब्ध नसल्याने क्रीडा व कला शिक्षकांची पदभरती रखडली होती. याबाबत बांदा भाजपचे पदाधिकारी गुरू कल्याणकर यांच्याकडून कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार मा.निरंजनजी डावखरे यांना निवेदन देऊन संचमान्यतेस मंजुरी देत शिक्षक भरतीची मागणी केली होती. याबाबत त्यांनी आमदार डावखरे यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. याविषयीची गांभीर्यता समजून आमदार निरंजन डावखरे यांनी हा विषय सरकारच्या निदर्शनास आणून देत, अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडून तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा एकदा संच मान्यतेत बदल करणाऱ्या आणि संचमान्यतेत सुधारित निकष विहित करणाऱ्या संचमान्यतेस मंजुरी देण्याचा निर्णय घेतला. याकरिता गुरु कल्याणकर यांनी आमदार निरंजनजी डावखरे यांची भेट घेत आभार व्यक्त केले. राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूळकर यांच्या नेतृत्वाखाली देखील याकरता शासन दरबारी वेळोवेळी आवाज उठवण्यात आला होता. या निर्णयामुळे शिक्षक पदभरतीचा मार्ग देखील मोकळा झाल्याने शिक्षकांनी देखील आनंद व्यक्त केला आहे. तसेच क्रीडा व कलाशिक्षक पदाच्या संच मान्यतेमधील समावेशाने राज्यातील मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने क्रीडा आणि कला शिक्षणाला चालना मिळेल. यावेळी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष सौ.श्वेताताई कोरगावकर, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग व ईतर प्रमुख भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *