आताच शेअर करा

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

दिनांक: २५ मे २०२५

वेंगुर्ले वीज कार्यालयातील कार्यरत अभियंता यांच्या बेजबाबदारपणामुळे  निलंबन करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थिती असताना मुख्यालय सोडू नये, असे आदेश असताना कार्यालयात गैरहजर राहून कामात कसूर केली म्हणून महावितरण कंपनीचे उपविभाग वेंगुर्ले येथील  शहर सहाय्यक अभियंता सचिन सखाराम उकंडे आणि उपकार्यकारी अभियंता अंकुश विजयराव कौरवार या दोन अधिकाऱ्यांना महावितरणचे सिंधुदुर्ग मंडळ अधीक्षक अभियंता तथा सक्षम अधिकारी अरविंद वनमोरे यांनी निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

     सिंधुदुर्ग जिल्हयात दि.२० मे पासून वादळी वाऱ्यांसह पाऊस दाखल होईल. त्यामुळे या काळात सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून मुख्यालय न सोडण्याचे आदेश जिल्हास्तरावरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागकडून देण्यात आले होते. मात्र, वेंगुर्ले तालुक्यात वीज वितरणचा सावळा गोंधळ होताच नागरिकांनी वेंगुर्ले कार्यालयात धडक दिली असता हे दोन्ही अधिकारी कार्यरत नव्हते. याबाबत संताप व्यक्त करत नागरिकांनी या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्या दोन्ही अधिकाऱ्यांवर कामात अनियमितता आणि दिलेल्या आदेशाचे पालन न केल्याचा ठपका ठेवून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

   आपल्या कामात कोणताही हवालदिल पणा खपवून घेतला जाणार नाही अशी जनतेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली होती. जनतेला नाहक त्रास दिल्यास व आपल्या जबाबदारीत खंड पाडल्यास सरकारी अधिकारी का असेना त्याचा परिणाम काय होतो याच प्रात्यक्षिक या घडलेल्या घडामोडीत दिसून आल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed