आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर

दिनांक: २१ ऑक्टोंबर २०२४


    बांदा शहरातील गजबजलेल्या बांदेश्वर मंदिर नाका येथे काल सायंकाळी उशिरा घडलेल्या ‘हिट अँड रन’ प्रकरणी बांदा पोलिसात मोटार चालक डॉमनिक आंतोन डिसोझा (रा. सातार्डा) यांच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून बांदा पोलीस फरार चालकाच्या शोधात आहेत. दरम्यान चालकाने दोन दुचाकीसह स्टॉलला धडक दिल्याने व चौकातील सीसीटीव्ही बंद असल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत. मोठ्या संख्येने जमाव जमल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी ज्यादा पोलीस कुमक मागवत शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्याना पाचारण केल्यानंतर परिस्थिती निवळली. आज सकाळी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी घटनास्थळी येत आढावा घेतला.
   आज सकाळी पोलीस बंदोबस्तात पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी घटनास्थळाचा फॉरेन्सिक टीमसह पंचनामा केला. सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राजेंद्र राणे यांच्या दुचाकीला देखील धडक दिल्याने त्यांनी बांदा पोलिसात रात्री उशिरा तक्रार दाखल केली.
  याबाबत सविस्तर माहिती अशी कि, काल (शनिवारी) सायंकाळी उशिरा क्रेटा मोटारीने (एमएच ०८ ४३८८) शहरातील बांदेश्वर मंदिर नाका येथे पोलिसांच्या भीतीने तब्बल अर्धा किलोमीटर रिवर्स गाडी घेत पोलीस कर्मचारी राजेंद्र राणे (एमएच ०७ यु ८९८७) व बिपीन येडवे (एमएच ०७ एक्यू ९१५०) यांच्या दुचाकीला धडक दिली. तसेच याठिकाणी असलेल्या राजन माजगावकर यांच्या वडापाव स्टॉलला देखील धडक दिली. यावेळी पोलीस कर्मचारी राणे यांच्या अंगावर देखील गाडी घालण्याचा प्रयत्न केला. धडक दिल्यानंतर मोटार चालकाने वाळकेश्वर मंदिर मार्गे महामार्गवरून धूम ठोकली. त्यामूळे  ग्रामस्थ आक्रमक झालेत.
  ग्रामस्थांनी चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची मागणी केली. मात्र कॅमेरे बंद असल्याची माहिती मिळाल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत. ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकत्रित आल्याने अखेर पोलीस निरीक्षक विकास बडवे हे घटनास्थळी दाखल झालेत. त्यांना देखील ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. ग्रामस्थांनी त्यांना जाब विचारताच वातावरण तणावपूर्ण बनले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याची शक्यता निर्माण झाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे हे घटनास्थळी दाखल झालेत. यावेळी आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी घटनेचे व्हिडीओ चित्रीकरण करणाऱ्या एका युवकाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेत पोलीस ठाण्यात नेले. जमाव शांत होत नसल्याने पोलिसांनी सावंतवाडी, निवती, कुडाळ व वेंगुर्ले येथून जादा कुमक मागविली. तसेच शीघ्र कृती दलाच्या दोन तुकड्याना पाचारण केले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे, कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सावंतवाडी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण आदिसह पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी उपस्थित होते. त्यानंतर रात्री उशिरा बांदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित मोटार चालकाविरोधात भादवी कलम १०९, १२५, ३२४, मोटार वाहन अधिनियम १८४, १३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. चालक फरार असून बांदा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
    बांदा पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळाचा तब्बल दोन तास पंचनामा केला. तसेच स्थानिकांकडून घटनेची माहिती घेतली. अधिक तपास पोलीस निरीक्षक विकास बडवे करत आहेत.

संपर्क 8369539769/9819957223

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *