आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर

दिनांक: २ ऑक्टोंबर २०२४


   विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध शैक्षणिक उपक्रमांसोबतच स्पर्धा परीक्षाच्या मार्गदर्शनासाठी देखील आम्ही नेहमीच तत्पर असू. ग्रामीण भागातील मुलांना अधिकारी बनविण्याचे स्वन साकार करण्यासाठी आमचे सर्वतोपारी प्रयत्न असतील अशी ग्वाही शैलेश लाड मित्रमंडळाचे अध्यक्ष शैलेश लाड यांनी येथे दिली.
   शैलेश लाड मित्रमंडळ पुरस्कृत नट वाचनालय बांदा व पीएम श्री केंद्रशाळा बांदा नं. १ यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या शालेय स्तरावरील रंगभरण व चित्रकला स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी श्री लाड बोलत होते. येथील केंद्रशाळेत संपन्न झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. २०० हून अधिक विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झालेत.
   यावेळी व्यासपीठावर नट वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष निलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, सहसचिव हेमंत मोर्ये, अंकुश माजगावकर, संचालक प्रकाश पाणदरे, संचालिका सौ. स्वप्नीता सावंत, शैलेश लाड मित्रमंडळाचे पदाधिकारी संदीप नार्वेकर, परीक्षक केदार कणबर्गी, मुख्याध्यापक शांताराम असनकर आदी मान्यवर उपस्थित होते. श्री लाड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून व सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
    प्रकाश पाणदरे म्हणाले कि, लाड मित्रमंडळाचे कार्य हे कौतुकास्पद असून भविष्यात त्यांनी विद्यार्थ्यांसाठी अधिक व्यापक स्वरूपात स्पर्धा घ्याव्यात. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीसाठी रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता पाचवी ते सातवी गटासाठी “सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करणारी मुले” हा विषय ठेवण्यात आला होता. स्पर्धेतील दोन्ही गटातील प्रथम पाच क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ७००, ५००, ३००, २००, २०० रुपये रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.
   विजेत्यांना १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिनी वाचनालयात होणाऱ्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक जे डी पाटील यांनी केले. आभार राकेश केसरकर यांनी मानले. यावेळी ग्रंथपाल सुस्मिता नाईक, सहाय्यक ग्रंथपाल सुनील नातू, अमिता परब, ओंकार राऊळ यांच्यासह शाळेतील शिक्षक, पालक, वाचक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *