
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक:३१ ऑगस्ट २०२४
‘गोविंदा रे गोपाळा …’ , ‘यशोदेच्या तान्ह्या बाळा..’ , ‘ लाल लाल पागोटा गुलाबी शेला … ‘ यासह अनेक हिंदी – मराठी गाण्यांवर ठेका धरत बांद्यात गोविदांमध्ये सळसळता उत्साह दिसून आला. डीजेच्या तालावर व गोविंदांच्या उत्साही वातावरणात मंगळवारी दहीहंडी उत्साहात साजरी करण्यात आली.
यावर्षी दहीहंडीचा मोठा उत्साह बांदा शहरात दिसला. शहरात सर्वप्रथम मानाची बांदेश्वर मित्रमंडळाची दहीहंडी सिहगर्जना कला क्रिडा मंडळ बांदा गडगेवाडी या गोविंदा पथकाने फोडली. वाफोली येथील माऊली गोविंदा मंडळाने गांधीचौक मित्रमंडळाची दहीहंडी फोडण्याचा मान मिळविला. गोविंदा पथकाने तब्बल सहा थर रचून ही दहीहंडी फोडली. या मंडळाने सर्वाधिक ३३ हजार ३३३ रुपये पारितोषिक ठेवले होते.
कट्टा कॉर्नर येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची दहीहंडी सिहंगर्जना गोविंदा पथकाने रात्री उशिरा फोडली. तसेच आळवाडी येथील दहीहंडी देखील सिहंगर्जना गोविंदा पथकाने फोडली. यावेळी शहरात उत्साह दिसून आला. पावसाची रिपरिप सुरु असल्याने गोविंदामध्ये उत्साह संचारला होता.
