
दिनांक: १०/१०/२०२६
बांदा : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसह कृषी विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या कार्यालयाचा शुभारंभ सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी बांदा येथे होणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत आणि युवा नेते विशाल परब यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
बांदा येथील रोशन सायरा कॉम्प्लेक्स, पहिला मजला, कार्यालय क्र. १०२ येथे सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यालयाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषीविषयक मार्गदर्शन, आवश्यक सहकार्य आणि त्यांच्या उत्पादनांसाठी योग्य बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
कृषकव्हेंचर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडची स्थापना ४ मार्च २०२१ रोजी झाली आहे. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त व गरजू शेतकऱ्यांना सक्षम करण्याबरोबरच त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, शेतीमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि कृषी क्षेत्रातील विविध संधींचा लाभ शेतकऱ्यांना घेता यावा, यासाठी कंपनीच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे.
‘शेतकरी सक्षम, तर शेती समृद्ध’ हे ध्येयवाक्य घेऊन कंपनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत राहणार आहे. स्थानिक शेतकऱ्यांना एकाच ठिकाणी मार्गदर्शन व सहकार्य मिळावे, तसेच त्यांच्या कृषी उत्पादनांच्या विपणनासाठी प्रभावी व्यवस्था निर्माण व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे.
या उद्घाटन सोहळ्यास शेतकरी बांधव, कृषी क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. कंपनीच्या वतीने जयेश सावंत, अर्जुन मोरजकर आणि दयानंद कुबल हे या उपक्रमासाठी कार्यरत आहेत.
