(गोवा): पेडणे प्रतिनिधि
दिनांक: २१ ऑगस्ट २०२४
तालुका वाचनालय मांद्रे पेडणे यांच्या वतीने एस. आर. रंगनाथन यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नाटककार, साहित्यिक तथा सिद्धहस्त लेखक श्री. महादेव हरमलकर उपस्थित होते. विशेष अतिथी म्हणून मांद्रे गावचे सरपंच श्री. प्रशांत नाईक, साहित्यिक परेश नाईक कु योगिता साळगावकर ग्रंथपालं अभिमन्यू गावस आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस दीपप्रज्वलन व एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
सरपंच श्री. प्रशांत नाईक यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देत तालुका वाचनालयात नोंदणी करून पुस्तकांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे श्री. महादेव हरमलकर यांनी एस. आर. रंगनाथन यांच्या जीवनकार्याची माहिती देऊन त्यांच्या उदात्त हेतूंविषयी सखोल मार्गदर्शन केले. आज भारतामध्ये ग्रंथालय आणि माहितीशास्त्रामध्ये जी काही प्रगती झालेली दिसत आहे. त्यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान डॉ. एस. आर. रंगनाथन यांचं आहे.
त्यामुळे त्यांना भारतीय ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हटलं जातं. त्यांच्या कार्याचा परिचय श्री हरमलकर यांनी आपल्या ओघवत्या भाषणातून करून दिला वाचनाने व्यक्तिमत्त्व कसे समृद्ध होते याचीही प्रचिती त्यांनी उपस्थितांना दिली.
वक्ते म्हणून रमाकांत दत्ताराम खलप विद्यालयाचे कर्मचारी व साहित्यिक श्री. परेश हनुमंत नाईक यांनी वाचनाचे महत्त्व, प्रकार आणि फायदे यावर प्रकाश टाकला. त्यांनी मोबाईल व संगणकाच्या अतिवापराचे दुष्परिणाम तसेच वाचनातील आनंद याविषयी विचार मांडले. पुस्तकातील ज्ञान आणि त्याची सत्यता हि रिल्स आणि तत्सम दृकश्राव्य माध्यमांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे हे त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मांद्रे वाचनालय च्या कर्मचारी सौ बिंदिया सातार्डेकर, महेश शेटगांवकर, अनिल कांबळी आदिनी परिश्रम घेतले
या कार्यक्रमास रमाकांत दत्ताराम खलप हायस्कूल व रोझरी हायस्कुल चें विद्यार्थी व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रंथपालं सौ.श्रावणी राऊळ यांनी केले तर आभार .ग्रंथपालं सौ विनिता बगळी यांनी मानले.