आताच शेअर करा

(गोवा): पेडणे प्रतिनिधि

दिनांक : १९ ऑगस्ट २०२४

उत्तर हिंदुस्थानातील पेशव्यांचे पराक्रमी सरदार महादजी शिंदे यांचे सरसेनापती म्हणून अतुलनीय पराक्रम गाजवणारे आणि स्वराज्याच्या तत्कालीन शत्रूंना आपल्या तलवारीचे पाणी पाजणारे थोर गोमंतकीय वीर आणि मुत्सद्दी बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर यांच्या कर्तृत्वाला आणि पराक्रमाला गोवा सरकारच्या गोवा मराठी अकादमीने ११७ वर्षांनंतर पुन्हा उजाळा दिला आहे. बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर यांचे नरहर व्यंकाजी राजाध्यक्ष यांनी लिहून १९०७ साली प्रसिद्ध केलेले विस्तृत चरित्र त्यामध्ये पूरक माहिती, पत्रे, पोवाडे आदींची भर घालून गोवा मराठी अकादमी दोन खंडांमध्ये प्रसिद्ध करणार आहे. ज्येष्ठ संपादक श्री. परेश प्रभू यांनी ह्या दोन्ही खंडांचे संपादन केले आहे.
बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर यांच्या चरित्राच्या ४२८ पृष्ठांच्या पहिल्या खंडाचा प्रकाशन सोहळा येत्या शुक्रवार दि. २३ ऑगस्ट २०२४ रोजी बिहारचे राज्यपाल श्री. राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते पेडणे येथील संत सोहिरोबानाथ शासकीय महाविद्यालयाच्या बहुद्देशीय सभागृहात सकाळी ठीक १०.३० वाजता होणार आहे. गोवा मराठी अकादमी व मराठी अकादमीचा पेडणे प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पेडणे येथील श्रीसंत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयाच्या सहकार्याने ह्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर यांनी महादजी शिंदे यांचे सरसेनापती म्हणून स्वराज्याच्या तत्कालीन शत्रूंविरुद्ध असंख्य लढायांतून पराक्रम गाजवलाच, शिवाय एक मुत्सद्दी म्हणून शिंद्यांच्या दरबारात त्यांचे महत्त्वाचे स्थान होते. दिल्लीच्या तख्तावर दुसर्‍या शाह आलमला बसविण्याच्या महादजी शिंदेंनी स्वीकारलेल्या कामगिरीत आणि शाह आलम बादशहाचे डोळे फोडणार्‍या गुलाम कादरचे पारिपत्य करण्याच्या मोहिमेतही जिवबादादांचा सक्रिय सहभाग होता. दक्षिणेत निझामाविरुद्ध झालेल्या खर्ड्याच्या प्रसिद्ध लढाईत जिवबादादांनी गाजवलेला पराक्रम इतिहासात अमर झाला आहे.
कै. नरहर व्यंकाजी राजाध्यक्ष यांनी शतकापूर्वी लिहिलेले जिवबादादांचे हे चरित्र पुनर्प्रकाशित करताना, केवळ जिवबादादाच नव्हेत, तर त्यांचे पराक्रमी चुलत बंधू जगन्नाथ राम केरकर तथा जगोबा बापू, बाळाजी राम ऊर्फ बाळाभाऊ बक्षी, जिवबादादांचे सख्खे बंधू शिवबानाना, महादजींच्या पश्चात् त्यांच्या विधवा स्त्रियांचा पक्ष घेतल्याने दौलतराव शिंद्याने अंगाला जळते बाण लावून क्रूरपणे हत्या केलेले जिवबादादांचे वीर पुत्र नारायणराव केरकर, त्यांचे सख्खे बंधू यशवंतरावभाऊ, त्याचबरोबर मूळ पार्से पेडणे येथील व महादजी शिंद्यांच्या पदरी असलेले शूर गोमंतकीय समशेरजंग बहाद्दर लक्ष्मण अनंत तथा लखबादादा लाड, त्यांचे पुत्र आबाजी ह्या सर्वांच्या कर्तृत्वाचा विस्तृत आढावा ह्या ग्रंथाच्या सत्तर पानी संपादकीयामध्ये संपादक श्री. परेश प्रभू यांनी घेतला आहे.
मूळ सुमारे सहाशे पानांचे हे चरित्र प्रत्येकी चारशेहून अधिक पृष्ठांच्या दोन खंडांत अकादमी प्रकाशित करणार असून पहिल्या खंडात मूळ चरित्राचा भाग, तर दुसर्‍या खंडामध्ये तत्कालीन पत्रव्यवहार, पोवाडे, बखरी, कैफियती व इतर पूरक माहितीचा समावेश करण्यात येणार आहे.
येत्या २३ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० वाजता पेडणे येथील श्रीसंत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयात होणार्‍या प्रकाशन सोहळ्याला प्रमुख पाहुणे बिहारचे राज्यपाल श्री. आर्लेकर यांच्यासमवेत विशेष निमंत्रित म्हणून संत सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. प्रवीणा केरकर, दैनिक नवप्रभाचे संपादक श्री. परेश प्रभू, तसेच गोवा मराठी अकादमीच्या पेडणे प्रभागाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत सांगले उपस्थित असतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत असतील. सोहळ्याचे सूत्रसंचालन श्री. गोविंद भगत हे करणार आहेत. ह्या ऐतिहासिक कार्यक्रमास पेडणे तालुक्यातील व राज्यातील इतिहासप्रेमी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *