
सिंधुदूर्ग:प्रतिनिधि
दिनांक:१४ ऑगस्ट २०२४
गोमंतकीय संगीत शिक्षक दिगंबर गाड यांचे निधन
बांदा (प्रतिनिधी) :
प्रसिद्ध गोमंतकीय संगीत शिक्षक तथा श्री बांदेश्वर संगीत कला वर्गाचे अध्यक्ष दिगंबर उर्फ बाळू गाड यांचे मुंबई येथे आज पहाटे उपचारा दरम्यान निधन झाले. गतवर्षी पासून ते दुर्धर व्याधीने त्रस्त होते. तरीही त्यांनी आपले संगीत शिक्षणाचे कार्य सुरूच ठेवले होते. बांदा परिसरातील शेकडो विद्यार्थ्यांना त्यांनी संगीताचे धडे दिले. हार्मोनियम वाजविण्यात त्यांचा हातखंडा होता. मुंबई, पुणे सह गोव्यातील दिग्गज कलाकारांना त्यांनी हार्मोनियम साथसंगत केली. अनेक कीर्तनकारांना त्यांनी साथ केली. गोवा राज्य शासनाच्या शाळेत संगीत शिक्षक सेवेतून ते दोन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते.
मडूरा बाबरवाडी येथे ते वास्तव्यास होते. त्यांनी संत गोरा कुंभार, महानंदा, पंढरपूर, पंढरीची वारी अशी अनेक संगीत नाटके संगीतबद्ध केली होती. सामाजिक, धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सक्रीय सहभाग असायचा.
आपले संपूर्ण आयुष्य संगीत सेवेसाठी आणि निरपेक्ष भावनेने संगीत शिक्षणाचे दान करण्यासाठी वाहिले. संध्याकाळी मोपा (गोवा) येथील निवासस्थानी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
