आताच शेअर करा

दिनांक: २८/०६/२०२६

सावंतवाडी : मळगाव येथे शनिवारी शिवशंभू ग्रुपच्यावतीने तिथीनुसार छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव (२६ जून) आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा शिवराजाभिषेक सोहळा (२७ जून) या दोन्ही ऐतिहासिक दिवसांचे औचित्य साधून जन्मोत्सव व शिवराजभिषेक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शिवराजाभिषेक प्रतिमा तसेच छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून दोन्ही महाराजांना मानवंदना देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात शिवराजाभिषेक प्रतिमेस व छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी निवृत्त राज्यपत्रित अधिकारी ह. भ. प. श्री शेखर पाडगावकर, मळगाव इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवण, माजी सैनिक तथा सर्पमित्र आनंद राणे, समीर परब आदी मान्यवरांसह शिवशंभू ग्रुपचे अध्यक्ष सहदेव राऊळ, खजिनदार सुनील राऊळ, ज्ञानेश्वर राणे, सुधीर राऊळ, उपाध्यक्ष प्रथमेश राणे, अश्विन गाड, अमित राऊळ, अमित नाईक, रितेश राऊळ, रंजना तेली, नितेश तेली, नितिन गावडे, महेश पंतवालावलकर, भगवान रेडकर, दाजी राऊळ, हर्षिता राऊळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात मान्यवरांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. तसेच विशेष उल्लेखनीय कामगिरीबद्दल रेबीज प्रतिबंधक कार्यात योगदान देणाऱ्या अमित नाईक, अमित राऊळ आणि पोलीस दलात भरती झालेल्या कु. क्षितिजा राऊळ यांचा शाल, श्रीफळ व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्यावतीने सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिव–शंभूंच्या पराक्रम, त्याग, स्वराज्यनिष्ठा व राष्ट्रभक्तीच्या विचारांवर मार्गदर्शन करून तरुण पिढीने या मूल्यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. तसेच शिवशंभू ग्रुप राबवित असलेल्या बलिदान मास, दुर्गामाता दौड, ऐतिहासिक शस्त्र प्रदर्शन आदी उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन समीर परब यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *