
दिनांक: २८/०६/२०२६
बांदा । प्रतिनिधी :
बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २०२६’ चा सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आला. रविवारी सकाळी ठीक ८ वाजता दीपप्रज्वलन करून आणि बालकांना पोलिओचे डोस पाजून या मोहिमेचे अधिकृत उद्घाटन झाले. या प्रसंगी बांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रियांका पर्शूराम नाईक प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.
शून्य ते पाच वर्षे वयोगटातील एकही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने विशेष नियोजन केले आहे. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण २५ बूथ, २ मोबाईल टीम आणि १ ट्रान्झिट टीम कार्यरत करण्यात आली असून, या माध्यमातून एकूण ९५७ लाभार्थी बालकांना पोलिओचे डोस देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
उद्घाटन प्रसंगी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांनी, पालकांनी आपल्या बालकांना पोलिओ डोस देऊन सुरक्षित करावे, असे आवाहन केले. त्यांच्या हस्ते उपस्थित बालकांना खाऊचे वाटपही करण्यात आले. या मोहिमेत आशा स्वयंसेविका अत्यंत मोलाची भूमिका बजावत असून नागरिकांनी आपल्या बालकांना लवकरात लवकर पोलिओ डोस द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमाला सावंतवाडीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर, बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन सारंग, निरवडे प्रा. केंद्राच्या डॉ. कुबल मॅडम, जिल्हा पर्यवेक्षक आर. आर. ठाकूर, तालुका पर्यवेक्षक शंकर परब, तालुका आरोग्य कार्यालय प्रतिनिधी अरुण गवस आणि आरोग्य सहाय्यक एस. एस. वेटे उपस्थित होते.
तसेच मडूराच्या समुदाय आरोग्य अधिकारी तेजस्विनी माजगांवकर, कनिष्ठ सहाय्यक दिनेश देसाई, आरोग्य सेविका मृणाली कदम, एन.सी.डी. स्टाफ नर्स अर्चना गोन्साल्विस, प्राथमिक आरोग्य केंद्रातील इतर कर्मचारी, आशा स्वयंसेविका, लाभार्थी बालके आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
