आताच शेअर करा

दिनांक: २८/०५/२०२६

संपादकीय: अंदमान आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा संघर्ष
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आयुष्यात आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात अंदमानच्या कारावासाला अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व आहे. ४ जुलै १९११ रोजी सावरकरांना अंदमानच्या क्रूर काळकोठडीत बंदी बनवण्यात आले आणि २१ जानेवारी १९२१ रोजी त्यांची तिथून सुटका झाली. या १० वर्षांच्या कालावधीत त्यांनी सहन केलेला अमानुष छळ आणि त्यांचा दृढ निश्चय हा इतिहास अंगावर काटा आणणारा आहे.
अंदमानची भीषण परिस्थिती त्या काळात अंदमान हे लहरी हवामान, घनदाट अरण्ये आणि दलदलीचे ठिकाण होते. ब्रिटिशांच्या राजवटीत गंभीर गुन्हेगारांना आणि राजबंद्यांना येथे काळ्या पाण्याची शिक्षा भोगण्यासाठी पाठवले जाई. तिथले हवामान आणि इंग्रज अधिकार्‍यांचे अत्याचार न सहन झाल्यामुळे अनेक कैद्यांना आपले प्राण गमवावे लागले.अमानुष छळ आणि सावरकरांचे धैर्य सावरकरांना अंदमानात कमालीच्या यातना सहन कराव्या लागल्या. त्यांना तेलघाण्याला जुंपले जाई, तर कधी नारळाच्या काथ्या कुटण्याचे कठीण काम दिले जाई. हे काम करताना हात रक्तबंबाळ होऊन अनेक वेळा ते मूर्च्छित पडत. मात्र, अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी आपली हिंमत हारली नाही. त्यांनी प्रत्येक शिक्षेकडे आणि कष्टाकडे एक संधी म्हणून पाहिले. कैद्यांना दिलासा आणि संघटन कारागृहातील अमानुष छळामुळे अनेक कैदी मानसिक संतुलन गमावून बसत किंवा आत्महत्या करत. अशा वेळी सावरकरांनी धीर खचलेल्या कैद्यांना उमेद दिली. “एक दिवस असा उजाडेल की याच कारागृहात तुमचे पुतळे उभारले जातील,” असा विश्वास त्यांनी कैद्यांमध्ये जागवला. त्यांनी राजबंद्यांची संघटना बांधली आणि आपल्या हक्कांसाठी संप पुकारण्यासही त्यांना प्रवृत्त केले.भिंतीवर कोरलेले महाकाव्य सावरकरांमधील कवी आणि साहित्यिक अंदमानच्या छळछावणीतही जिवंत होता. कोठडीत असताना कागद आणि पेन्सिल उपलब्ध नसतानाही, त्यांनी कोठडीच्या भिंतींनाच आपला कागद बनवले आणि काट्या-विटांच्या तुकड्यांना पेन्सिल बनवून ‘कमला’ आणि ‘गोमांतक’ यांसारखी अजरामर महाकाव्ये रचली. ही महाकाव्ये त्यांनी केवळ भिंतींवर लिहिली नाहीत, तर ती पाठ करून स्मरणात ठेवली.

II स्वातंत्र्यसूर्य सावरकर II

ब्रायटनच्या त्या दूर समुद्रकिनारी बसून भारी,
व्याकुळ होऊनी हृदय तिथे आर्ततेने रडले।
‘ने मजसी परत मातृभूमीला’ सांगत सागराला,
स्वदेशप्रेमाचे अजरामर हे काव्य तिथे घडले।।१।।

परक्या भूमीचे अफाट ऐश्वर्य अन ते मोठे वैभव,
त्यांच्या पवित्र अन देशभक्त मनाला कधी ना भुलवले।
आपल्या लाडक्या मायभूमीच्या साध्याशा झोपडीत,
सर्व सुख-समाधान त्यांनी अखंडपणे पाहिले।।२।।

अथांग पसरलेल्या त्या अफाट अद्भूत सागरालाही,
थोर ऋषींच्या अफाट दिव्य तेजाची आण दिली।
वचनभंगाच्या त्या क्रूर उर्मट अशा अट्टाहास्याला,
अगस्ती ऋषींच्या पराक्रमाची याद त्यांनी दिली।।३।।

नसानसात त्यांच्या अखंड खेळले ते असीम शौर्य,
क्रांतीचे ते अनुपम क्षात्रतेज अंगात उसळले।
अन्यायी जुलमी अशा परकीय इंग्रज सत्तेचे,
बलाढ्य सिंहासन त्यांनी पराक्रमाने हलवले।।४।।

विज्ञाननिष्ठ अशा श्रेष्ठ सुंदर विचारांची त्यांनी,
समाजाला एका नव्या क्रांतीची दिशा दाखवली।
अंधश्रद्धा आणि जुनाट घातक रूढी-परंपरांची,
विचारांच्या अग्नीने ती जळती होळी पेटवली।।५।।

अखंड संसाराची झाली जरी हो राखरांगोळी,
देशमुक्तीचे उदात्त ध्येय त्यांचे कधी ना ढळले।
देशसेवेच्या या परम पवित्र अशा महाव्रतात,
स्वाभिमानाने त्यांचे कुटुंब संपूर्ण जळले।।६।।

काळकोठडीत मृत्यूच्या त्या क्रूर दाढेत बसून,
ज्यांनी देशासाठी अनंत भीषण यातना सोसल्या।
मातृभूमीच्या पवित्र अशा पावन मुक्ततेसाठी,
फासाच्या भयानक दोऱ्याही तिथे सुखाने हसल्या।।७।।

या अथांग निळ्या नभात जोवर राहतील सूर्य-चंद्र,
तोवर तुमचे हे पावन नाव जगात गाजेल।
तुमच्या या असीम त्यागाच्या दिव्य प्रखर तेजाने,
हिंदुस्थान हा देश आमुचा अखंड पाजळेल।।८।।


शब्दांकन
दादासाहेब फाळके प्रेरणा पुरस्कार सन्मानित
राष्ट्रीयकवी – संतोष चिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed