आताच शेअर करा

दिनांक: ०८/०७/२०२६

सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर आणखी तीन महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे कोकणातील रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मंजूर करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मंगळुरू एक्सप्रेस (१२१३३/१२१३४), तिरुवनंतपुरम सेंट्रल–हजरत निजामुद्दीन राजधानी एक्सप्रेस (१२४३१/१२४३२) तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस–तिरुवनंतपुरम उत्तर (कोचुवेली) गरीब रथ एक्सप्रेस (१२२०१/१२२०२) या गाड्यांचा समावेश आहे.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्राद्वारे या निर्णयाची अधिकृत माहिती दिली आहे. यापूर्वी २५ मार्च २०२६ रोजी सावंतवाडी रोड स्थानकावर विविध गाड्यांना थांबा देण्याबाबत मुख्यमंत्री यांनी केलेल्या पत्रव्यवहाराची दखल घेत ही मान्यता देण्यात आली आहे.

या नव्या थांब्यांमुळे मुंबई, दिल्ली, केरळ आणि कर्नाटकसह देशातील विविध भागांशी सावंतवाडीचा रेल्वे संपर्क अधिक मजबूत होणार आहे. तसेच पर्यटन, व्यापार आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून, कोकणातील रेल्वे सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *