आताच शेअर करा

दिनांक: २५/०३/२०२६

बांदा: बांदा-दाणोली या राज्यमार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून सदर मार्गावरील मुंबई-गोवा महामार्ग ते निमजगा पीडब्ल्यूडी ग्राउंड दरम्यानचा अंदाजे एक किलोमीटरचा रस्ता हा तीव्र उताराचा असून रस्त्याला लागूनच सर्व घरे असल्याने तसेच येथेच जिल्हा परिषदेची मोठी पटसंख्या असलेली शाळा देखील रस्त्याला लागूनच असल्याने सध्या सुरू असलेल्या रुंदीकरणाच्या कामात अनेक व्यत्यय येत आहेत. याबाबत ग्रामस्थांचे आक्षेप देखील आहेत. या करिताच आज बांदा येथील निमजगा वाडीतील ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले.
                         सदर रस्ता हा राज्यमार्ग होणार असल्याने सदर मार्गावर असलेला तीव्र उतार पाहता राज्यमार्गाच्या निकषांच्या दृष्टीने हा रस्ता परिपूर्ण ठरत नाही. तसेच इथे असलेली शाळा, दाट लोकवस्ती यामुळे भविष्यात होणारे अपघात व इतर बाबींचा विचार करून सदर रस्त्याला अगोदरच बायपास करून मुंबई-गोवा महामार्गाला रस्ता जोडण्यात यावा. जेणेकरून येथील रस्त्याच्या दृष्टीने अयोग्य असलेली भौगोलिक परिस्थिती व इतर बाबींचा विचार करता भविष्यकाळात उद्भवणाऱ्या अडचणी टाळता येतील. अशी निवेदनात मागणी करण्यात आली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर याच पट्ट्यातील अरुंद रस्त्यावरून जाणाऱ्या दहा व बारा चाकी खनिज वाहतूक करणाऱ्या डंपरच्या विरोधात देखील येथील ग्रामस्थांनी नेहमीच आक्रमक भूमिका दाखवली आहे. तरी या रस्त्याचे तातडीने सर्वेक्षण करून सदर रस्त्याला बायपास करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतर्फे करण्यात आली.
                        यावेळी माजी बांदा सरपंच स्वप्नाली पवार, दीपक नाईक, भुषण सावंत, केशव नाईक, समिर मयेकर, संदेश नाईक, गुरुप्रसाद गडेकर, रेणूका सुभेदार, पुजा नाईक, गायत्री गडेकर, मिताली सावंत-मोर्ये व अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *