
दिनांक: ०६/०८/२०२६
आंबोली: आंबोली येथील प्रसिद्ध महादेवगड पॉईंट येथे सुरक्षेचे रेलिंग ओलांडण्याची एक क्षणाची चूक निपाणी (जि. बेळगाव) येथील पर्यटकाच्या जीवावर बेतली. सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तब्बल १८ तासांच्या थरारक आणि जीव धोक्यात घालणाऱ्या शोधमोहीमेनंतर बुधवारी दुपारी सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू ग्रुप, आंबोली–सांगलीच्या जवानांनी त्यांचा मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढला.
डॉ. आयुब सय्यद हे नऊ सहकाऱ्यांसह वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आंबोली येथे आले होते. मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना त्यांनी लघुशंकेसाठी सुरक्षेचे रेलिंग ओलांडून दरीच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अचानक तोल गेल्याने ते थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले.
या भीषण घटनेचा प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या तेथील मक्याची कणसे विकणाऱ्या स्थानिक विक्रेत्याने तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना माहिती दिली. त्यानंतर सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.
अपघात सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे २०० फूट पुढील जंगल भागात झाल्याचा अंदाज होता. मात्र, डॉ. सय्यद यांचा मोबाईल अपघातस्थळीच राहिल्याने त्यांचे अचूक लोकेशन मिळू शकले नाही. अंधार वाढल्यामुळे मंगळवारी रात्री शोधमोहीम थांबवावी लागली.
बुधवारी पहाटे सह्याद्री एडवेंचर रेस्क्यू ग्रुपने पुन्हा धाडसी शोधमोहीम सुरू केली. निसरडे कडे, खोल दरी आणि अत्यंत धोकादायक परिस्थितीत दोरांच्या साहाय्याने रेस्क्यू जवानांनी शोधकार्य राबविले. सकाळी सुमारे दहा वाजता डॉ. सय्यद यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर अनेक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले.
या धाडसी बचाव मोहिमेत बाबल आल्मेडा, मायकल डिसोजा, संतान आल्मेडा, उत्तम नार्वेकर, लॉरेन्स आल्मेडा, राजू राऊळ, प्रथमेश गावडे, पासकु देसा, अजित नार्वेकर, समीर गावडे, आनंद गावडे, विशाल बांदेकर, प्रतीक मोहिते, नारायण चव्हाण, शुभम कळसुलकर, सर्वेश नाईक, मनीष नार्वेकर, वामन पालेकर, राकेश अमरुस्कर, दीपक मेस्त्री, अजित गावडे, रघुनाथ सावंत, अभिजित नार्वेकर आणि हेमंत नार्वेकर यांनी सहभाग घेतला.
⚠️ पर्यटकांसाठी प्रशासनाचा कडक इशारा
या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासन आणि रेस्क्यू पथकाने पर्यटकांना स्पष्ट इशारा दिला आहे. सुरक्षेसाठी उभारण्यात आलेले रेलिंग ओलांडणे, धोकादायक कड्यांवर जाणे किंवा सेल्फीच्या नादात निष्काळजीपणा करणे थेट मृत्यूला आमंत्रण ठरू शकते. पर्यटनस्थळी सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करून स्वतःचा आणि कुटुंबाचा जीव सुरक्षित ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
