
दिनांक: २५/०३/२०२६
सावंतवाडी: वलसाड, गुजरात : येथील ‘लेखणीचा साहित्य मंच’ आयोजित ४ थ्या राष्ट्रीय साहित्य संमेलनासाठी कोकणचे सुपुत्र कवी श्री. संतोष चिले यांना विशेष निमंत्रण पत्रिकेने सन्मानपूर्वक निमंत्रित करण्यात आले होते. या संमेलनात त्यांनी आपल्या ‘पर्यावरण : हाच नव-नारायण’ या कवितेतून निसर्ग संवर्धनाचा जागर केला. वाढते शहरीकरण आणि मानवी हव्यासामुळे होणाऱ्या निसर्गाच्या ऱ्हासावर त्यांनी या कवितेतून अत्यंत परखड भाष्य केले.
विज्ञानाच्या आंधळ्या गर्वापोटी मानव आज निसर्गाच्या अस्तित्वाशी खेळत आहे, ही प्रगती नक्की “शाप की वरदान?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. “निसर्गालाच आव्हान देऊनी, दावा ठोकतो मंगळावरी” अशा शब्दांत कवीने मानवाच्या अहंकारावर आणि निसर्गाशी चाललेल्या संघर्षावर बोट ठेवले आहे. केवळ समस्या मांडून न थांबता, या संकटातून मार्ग काढण्यासाठी मानवाने वेळीच सावध होण्याचे आवाहनही त्यांनी केले. पर्यावरणालाच ‘नव-नारायण’ मानून त्याचे रक्षण करण्याचा दिलेला मंत्र तिसऱ्या महायुद्धाच्या उंबठ्यावर असलेल्या जगासाठी जागतिक संदेश देणारा ठरला
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रंगलेल्या भव्य ‘काव्य मैफिलीत’ श्री. संतोष चिले यांनी आपल्या खास शैलीत आणि दमदार आवाजात सादरीकरण केले. त्यांच्या शब्दांतील भाव आणि कोकणी मातीचा सुगंध वलसाडच्या ‘अक्षर महोल’ सभागृहात दरवळला, ज्याला रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.
संमेलनाच्या आयोजकांच्या हस्ते श्री. चिले यांचा विशेष गौरव चिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. अत्यंत शिस्तबद्ध, रसिक आणि साहित्यनिष्ठ वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात देशभरातील विविध भागांतील कवींनी आपली कला सादर केली. मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या साहित्यप्रेमींच्या प्रतिसादामुळे हे संमेलन यशस्वीरीत्या संपन्न झाले. स्नेहभोजनाने आणि साहित्यावरील अनौपचारिक गप्पांनी या यशस्वी सोहळ्याची सांगता झाली.
