आताच शेअर करा

दिनांक: २५/०३/२०२६

बांदा: बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून आयोजित करण्यात आलेल्या सिंधू आरोग्य मेळाव्याला बांदा सरपंच यांच्यासह इन्सुली जिल्हा परिषद सदस्य व बांदा पंचायत समिती सदस्य यांना निमंत्रित करण्यात न आल्याने बांदा शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम स्थळी येत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी शहर विकास आघाडी व भाजपच्या कार्यकर्त्यात शाब्दिक बाचाबाची झाल्याने काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी जाहीररीत्या दिलगिरी व्यक्त केली.
    बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आज सकाळी साडेनऊ वाजता आरोग्य मेळाव्याचे मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रमोद कामत होते. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय व सावंतवाडी तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.
   इन्सुली जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ, पंचायत समिती सदस्य सदा राणे, यांच्यासह बांदा शहर विकास आघाडीचे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य साईप्रसाद काणेकर, सुशांत पांगम, मनसेचे तालुकाप्रमुख मिलिंद सावंत, निगुडेचे माजी उपसरपंच गुरूदास गवंडे, कास सरपंच प्रवीण पंडित यांनी या ठिकाणी येत प्रशासनातील अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी प्रमोद कामत यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त करत सर्वांना शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र शहर विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आपला रोष हा अधिकाऱ्यांवर असल्याचे सांगितले. अधिकाऱ्यांनी जाणून-बुजून लोकप्रतिनिधींच्या नावांचा निमंत्रण पत्रिकेत उल्लेख केला नसल्याचा आरोप केला. तसेच भाजपचे पदाधिकारी हे व्यासपीठावर असल्याने हा कार्यक्रम भाजप पक्षाचा की प्रशासनाचा असा सवाल देखील उपस्थित केला. यावेळी प्रशासनाची चूक मान्य करत डॉ. धुरी व श्री खेबुडकर यांनी सर्वांची दिलगिरी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *