
दिनांक: २५/०३/२०२६
मालवण: चिंदर आणि आचरे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील, मालवण तालुक्यातील दोन निसर्गरम्य गावे. जिथे समुद्र, डोंगर, देवराई आणि परंपरा यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळतो. या दोन गावांच्या सीमेवरील माळरानावर उभा असलेला एक समृद्ध ऍग्रो टुरिझम फार्म म्हणजे निसर्गाच्या कुशीत विसावलेले एक स्वप्नच म्हणावं लागेल.
या फार्मचे शिल्पकार आहेत चंद्रकांत करंजे, आर्मीतील क्लेरिकल सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही न थांबणारी जिद्द आणि प्रयोगशीलता जपणारे एक व्यक्तिमत्त्व. सैन्यातील शिस्त, निवृत्तीनंतर पुण्यातील शैक्षणिक सेवेचा अनुभव व त्यानंतर स्वतःच्या गावी परत येत त्यांनी उभारलेले हे फार्म स्टे म्हणजे त्यांच्या मेहनतीचा आणि प्रेमाचा सुंदर आविष्कार आहे.
आमराईच्या मधोमध वसलेले हे फार्म, स्विमिंग पूल, बागेतील रोषणाई, आणि गर्ग शांततेत डुंबवणारे वातावरण पर्यटकांना मनमोकळा अनुभव देतात.
कोकणी परंपरेचा गोडवा त्यांच्या जीवनात स्पष्ट जाणवतो. आचरे बंदराजवळील पिरवाडी येथील त्यांचे छोटे पण आकर्षक घर, वारली चित्रांनी सजलेली कंपाउंड भिंत, जांभ्या दगडातील तुलसी वृंदावन आणि माडांच्या बागेनी वेढलेले वातावरण हे सर्व त्यांच्या साधेपणाची आणि सौंदर्यदृष्टीची साक्ष देतात.
गोव्यातून आम्ही पाच मित्रांनी या फार्मवर एक रात्र आणि एक दिवस घालवला. माझ्यासाठी हा पहिलाच अनुभव होता, पण इतर मित्रांचे हे नित्याचे व आवडते ठिकाण. खवय्ये असलेल्या आमच्या ग्रुपचा एक खास नियम म्हणजे स्वतः स्वयंपाक करून जेवणाचा आनंद घेणे !
आम्ही चिंदरला जायला निघालो तो होळीचा दिवस होता. आम्ही संध्याकाळपर्यंत बकऱ्याचे मांस मिळवण्यासाठी बराच आटापिटा केला, पण शेवटी हाती निराशाच आली. तरी शेवटच्या क्षणी करंजे यांनी गावरान कोंबडीची उत्तम सोय केली. आम्ही पोहोचण्याआधीच त्यांनी सर्व तयारी करून ठेवली होती. एखाद्या कुटुंबातील सदस्याने आपुलकीने व्यवस्था पहावी तसे त्यांचे आदरातिथ्य होय.
रात्रीच्या स्वयंपाकाची जबाबदारी होती मनोजकडे. चिंदरचा भूमिपुत्र. गोव्यात कंटाळा आला की चिंदर गाठणारा मनोज, या गावाबद्दल अपार प्रेम बाळगतो. त्याच्या गप्पांमधून गावाची ओळख आणि ओलावा उजागर होत राहतो. रात्री कराओके गाण्यांच्या तालावर स्वयंपाकि आणि खवय्ये यांची दमदार मैफिल रंगली.
*“गावपळवन”: परंपरेचा अनोखा ठेवा*
चिंदर गावाची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे “गावपळवन”. दर तीन वर्षांनी ठराविक वेळी संपूर्ण गाव तीन दिवसांसाठी गाव सोडून बाहेर राहतो. वाईट शक्तींना गाव रिकामे करून देण्याची ही प्रथा. या कालावधीत सर्व गांवकारी गावाबाहेर एकत्र राहतात, आणि नंतर तीन दिवसानंतर पुन्हा आपल्या घरी परततात. ही परंपरा वर्षानुवर्षे सुरु असून ती गावाच्या एकात्मतेची जिवंत साक्ष आहे.
आचरे आणि चिंदर ही दोन्ही गावे मंदिरांनी आणि देवराईंनी समृद्ध आहेत. विशेषतः दोन्ही गावातील रामेश्वर मंदिरे धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाची प्रतीकं आहेत. आचऱ्याचे इनामदार रामेश्वर मंदिर आणि त्याची केवळ मंदिराकडे असलेली इनामी हे या मंदिराचे वैशिष्ट्य होय.
आचरेचा समुद्रकिनारा, कांदळवनातील सफारी, आणि समुद्र- नदी संगम पर्यटकांना मोहून टाकतात. पाण्याच्या मध्यातून पिरवाडीपर्यंत जाण्यारा बांध रस्ता एक अविस्मरणीय अनुभव आहे.
गावभेट, ग्रामदर्शन आणि तिथल्या जीवनाची खऱ्या अर्थाने ओळख झाली ती दुसऱ्या दिवशी. मी करंजे यांच्यासोबत कोचरे बंदराला भेट देण्यासाठी निघालो तेव्हा गावाचे अंतरबाह्य सौंदर्य अनुभवता आले. मी वगळता आमच्या गटातील सर्वच विश्रांतीप्रिय. त्यामुळे त्यांना फार्म सोडून बाहेर पडण्याचा काही मोह झाला नही. पण मी नवीन ठिकाणी गेल्यावर गप्प बसणारा अवलिया नव्हेच. मनोमन भ्रमंती करायचा बेत आखला.
दुपारच्या जेवणाची तयारी करण्यासाठी आचरे बंदर गाठले. येथे ताजे मासे आणायला गेलो. दर्यातील एकदम फ्रेश सारंगी, बांगडे, तार्ले अगोदरच ऑर्डर करून ठेवलेले. एका कोळीवाल्याच्या घरी मागीलदारी जाऊन मासे घेतले. करंजे यांच्या बंधूनी मोठ्या प्रेमाने सर्व मासे साफ करून दिले.
तोपर्यंत करंजेनी गावदर्शन घडविले. गावफेरीदरम्यान त्यांच्या वाड्यावरील कुबल घराण्याचा प्रसिद्ध गोकुळाष्टमी उत्सवाची परंपरा समजून घेता आली.श्रीकृष्ण हे इथल्या गावकऱ्यांवर मनोराज्य गाजवीणारे दैवत. त्यासाठी अंदाजे एक कोटी खर्चून याठिकाणी भव्य राधाकृष्ण मंदिर साकारत आहे ते अनुभवता आले. होळीचा दुसरा दिवस साक्षात आचरे गावचे अंतर्मन उलगडणारा होता. छोट्या पोरापासून मोठी मंडळी रंगात न्हावून निघाली होती. आचरे गावांत धुलिवंदनाचा उत्साह आसमंती निनादत होता.
“स्वर्गापेक्षा सुंदर आसा माझो आचरा गांव, तुमी येऊन बघा आणि बघून जावा प्रसन्न होतला मन ” हे गाणं गात फिरणारा ग्रामीण कलाकार जणू गावाच्या आत्म्याचे प्रतीक वाटला.
महात्मा गांधीसोबत कराचीपर्यंत सत्याग्रहात सहभागी झालेले व पुढे देशासाठी हौतात्म्य पत्करलेले आचरे गावचे सुपुत्र थोर स्वातंत्र्यसैनिक दत्ताराम भाऊ कोयंडे यांचे जतन केलेले घर याच ठिकाणी पाहायला मिळाले. पिरवाडीवरील धार्मिक स्थळ, आणि हिंदू–मुस्लिम–ख्रिस्ती समाजातील सलोखा या सर्व गोष्टी गावाला विशेष ओळख देतात.
चिंदर–आचरे परिसरात आदिमानवाच्या पाऊलखुणांचे कातळशिल्प, पावसाळ्यातील तन व मनाला चिंब भिजवणारे धबधबे, नागझरी तलाव, आचरे श्रीधर थिएटर, छत्रपती भोसले घराण्याचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक वाडा आणि समृद्ध जैवविविधता हे सर्व अनुभवताना मन नकळत या गावांमध्ये गुंतून जाते.
चंद्रकांत करंजे यांच्यासारखा कोकणी सोल्जर – शिस्त, माणुसकी, प्रयोगशीलता आणि नात्यांची उब जपणारा देवदूत होय. त्यांच्या सहवासामुळे चिंदर आचरे हा अनुभव केवळ पर्यटनापुरता सीमित न राहता एक जिवंत स्मृती बनला. चिंदर- आचरे हे केवळ पर्यटन स्थळ नाही, तर निसर्ग, संस्कृती आणि माणुसकी यांचा सुंदर संगम आहे.
🧭 लेखन: भावार्थ रघुनाथ मांद्रेकर,*
कोरगाव – पेडणे, गोवा
