
दिनांक: ३०/०१/२०२६
बांदा : निमजगा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेच्या लगत असणाऱ्या मार्गावरून सातत्याने अवजड वाहतुकीकडे शाळा व्यवस्थापन समिती व पालकांनी वेळोवेळी प्रशासनाला कल्पना देऊनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने पालकांनी शाळा बंद आंदोलन सुरु केले. ग्रामस्थ व पालक यांनी सिंधुदुर्गनगरी येथे यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर २६ पासून साखळी उपोषण सुरु केले आहे.
विद्यार्थ्यांच्या जीवितास या अवजड वाहतुकीमुळे गंभीर धोका निर्माण झाल्याने शाळा व्यवस्थापन समिती, पालक व स्थानिक ग्रामस्थांनी शाळा बंद आंदोलनाचा लेखी इशारा यापूर्वीच दिला होता. याबाबतचे निवेदन गट शिक्षणाधिकारी (प्राथमिक), पंचायत समिती सावंतवाडी यांना देण्यात आले होते. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शाळेच्या चारही बाजूंनी अतिक्रमण झाल्यामुळे तसेच शाळेजवळून जड वाहतूक (डंपर, ट्रक, ट्रॅक्टर इ.) सुरू असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
शाळेच्या संरक्षक भिंतीची कोणतीही व्यवस्था नसून, अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या संदर्भात यापूर्वी ग्रामपंचायत, शिक्षण विभाग व संबंधित यंत्रणांकडे वारंवार तक्रारी व निवेदने देण्यात आली आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे भविष्य व सुरक्षितता धोक्यात आली असून पालकांमध्ये तीव्र असंतोष आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अन्यथा शाळा बंद आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय शाळा व्यवस्थापन समिती, पालक व ग्रामस्थांनी एकमताने घेतला आहे.
होणाऱ्या आंदोलनानंतर परिस्थितीची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आज शुक्रवारी पाचव्या दिवशी पालकांनी मुलांना शाळेत न पाठविता शाळा बंद आंदोलन सुरु आहे.
अवजड वाहतुकीमुळे मुलांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे. याबाबत आम्ही अनेक वेळा प्रशासन आणि आरटीओला कळवले, मात्र अजूनही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे कोणताही राजकीय हेतू नसताना, केवळ मुलांच्या सुरक्षिततेसाठी पालकांनी तात्पुरता निर्णय घेऊन मुलांना शाळेत न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला शिक्षण बंद करायचे नाही, पण जिवापेक्षा शिक्षण मोठे नाही. शाळेच्या वेळेत अवजड वाहतुकीवर तात्काळ बंदी आणि सुरक्षिततेची हमी मिळावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समिती,पालक व ग्रामस्थांनी केली आहे.
