
सिद्धी भिडे.
दिनांक: २३/०१/२०२६
बांदा: बांदा-रामनगर येथील सिद्धी शिवानंद भिडे (वय २०) हिचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सिद्धीच्या अकाली जाण्याने बांदा परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
कर्करोगासारख्या दुर्धर आजाराशी सातत्याने लढा देत सिद्धीने समाजासमोर जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाचे प्रेरणादायी उदाहरण उभे केले होते. रक्ताचा कर्करोग आणि त्यानंतर ब्रेन कॅन्सर अशा कठीण संघर्षातूनही ती डगमगली नाही. उपचार सुरू असतानाही अभ्यासात सातत्य ठेवत तिने नीट परीक्षेत ६६४ गुण मिळवत कोकण विभागात अव्वल ठरण्याचा गौरव मिळवला होता. डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती शेवटपर्यंत ध्येयासाठी झटत राहिली.
सिद्धीच्या निधनाने एक जिद्दी, गुणवान आणि असामान्य संघर्ष करणारे व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले आहे. तिच्या संघर्षातून अनेक रुग्णांना आणि विद्यार्थ्यांना आशा व प्रेरणा मिळाली होती. आज तिच्या जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्रपरिवार, शिक्षकवर्ग आणि बांदा पंचक्रोशीतील नागरिकांनी तिच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण केली आहे. आज दुपारी येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा भिडे कोचिंग क्लासेसचे संचालक शिवानंद भिडे यांची ती कन्या होय. तिच्या पच्छात आईवडील आहेत.
