
पाडलोस : प्राथमिक शाळांच्या एकत्रित क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करताना प्रणित गावडे. सोबत सलोनी पेडणेकर, राजू शेटकर, सुधीर गावडे आदी.
दिनांक: २३/०१/२०२६
बांदा : प्रतिनिधी
स्पर्धेच्या युगात यश मिळवण्याच्या नादात अनेकजण आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक संतुलन आणि योग्य जीवनशैली यांचा अभाव निर्माण झाल्यास त्याचा थेट परिणाम कार्यक्षमता व आयुष्यावर होतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी विश्रांती आणि तणावमुक्त जीवनशैली स्वीकारल्यासच खऱ्या अर्थाने यश टिकवता येते. आरोग्य सुदृढ असेल तरच स्पर्धेत टिकून राहता येते, अन्यथा मिळवलेले यशही अल्पकालीन ठरते, असे प्रतिपादन पाडलोस गाव ग्रुपचे अध्यक्ष प्रणित गावडे यांनी केले.
पाडलोस गाव ग्रुप व शाळा व्यवस्थापन समिती यांच्या वतीने आयोजित पाडलोस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नं. १,२,३ च्या एकत्रित बाल क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन प्रणित गावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सलोनी पेडणेकर, उपसरपंच राजू शेटकर, गाव ग्रुपचे सचिव अमेय गावडे, उपाध्यक्ष राजा आंबेकर, खजिनदार, बापू माधव, माजी मुख्याध्यापक गोपाळ करमळकर, पाडलोस सोसायटी व्हाईस चेअरमन विश्वनाथ नाईक, भजनी बुवा अजित गावडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तेजल गावडे, मयुरी कुबल, उपाध्यक्ष सुधीर गावडे, शिक्षक विजय गावडे, अनिल वरक, अमोल प्रभू, देवेंद्र पालव, ग्रामस्थ, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.
मंगळवारी सकाळपासून दुपारपर्यंत अनेक स्पर्धा घेण्यात आल्या. संपूर्ण स्पर्धांचे सूत्रसंचालन विजय गावडे यांनी केले. गाव ग्रुपचे संस्थापक विश्राम गावडे यांनी शुभेच्छा दिल्या. अमेय गावडे यांनी आभार मानले.
*मुलांच्या भवितव्यासाठी झटणारा ग्रुप*
सोशल मीडियावर व्हाट्सएप ग्रुप अनेक आहेत. केवळ मेसेज न करता पाडलोस गाव व्हाट्सएप ग्रुप शैक्षणिक, क्रीडा, आरोग्य, धार्मिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. असा ग्रुप पाहिला नाही. लहान मुलांच्या भवितव्यासाठी झटणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. अशा शुभेच्छा देत सावंतवाडी येथील कमलेश ठाकूर यांनी वडील कै. पांडुरंग रामा ठाकूर यांच्या स्मरणार्थ शैक्षणिक साहित्य प्रदान केले.
