आताच शेअर करा

दिनांक: १७ डिसेंबर २०२५

शिरोडा: आज सोमवार दिनांक १५ डिसेंबर २०२५ रोजी आरवली टांक येथील श्री सरस्वती विद्यालयात शाळेच्या भवितव्याबाबत ग्रामस्थ एकवटले. १५ मार्च २०२४च्या शासन निर्णयांमुळे  या विद्यालयातील शिक्षक संख्या कमी होऊन भविष्यात शाळा बंद होण्याची गंभीर बाब पालकांच्या लक्षात आल्याने  आज हायस्कूलच्या परिसरात गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी,   पालक, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ व हितचिंतक बंधूभगिनी मोठ्या संख्येने जमा झाले. वर्तमानपत्रातून येणाऱ्या बातम्या पाहता आपल्या शाळेला भविष्यात  होऊ पाहणारा धोका लक्षात घेऊन यावेळी उपस्थित सर्व पालकांनी आपली शाळा वाचवण्यासाठी आणि आपल्या परिसरातील विद्यार्थी याच शाळेत शिकावा यासाठी संयुक्त सह्यांची मोहिम राबवून आपले म्हणणे सरकार दरबारी माननीय जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडे मांडण्यासाठी चर्चेतून निवेदन तयार केले. यावेळी ‘शाळा वाचवा शिक्षण वाचवा’ या सदराखाली उपस्थित पालकांची व ग्रामस्थांची एक कृती समिती स्थापन करण्यात आली. समितीचे अध्यक्ष म्हणून श्री. बबन बागकर तर सचिव म्हणून श्री. यशवंत फटनाईक यांची निवड करण्यात आली. त्यानंतर सर्वांच्या चर्चेतून सदस्यांची निवड करण्यात आली. यावेळी सागरतीर्थ ग्रामपंचायतचे सरपंच श्री. एकनाथ कुडव यांनी या सभेचे नेतृत्व करत आपण सर्व मिळून शाळेच्या आणि मुलांच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी एकदिलाने मार्ग काढू या, असे आवाहन केले. आरवली ग्रामपंचायतचे सरपंच श्री. समीर कांबळी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना शाळा वाचवताना प्रत्येकाने या लढ्यात झोकून द्यावे. तसेच आपल्या आजूबाजूची सर्व मुले या आपल्या शाळेकडे कशी दाखल होतील, यासाठी प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंती सर्वांना केली. शाळा वाचवण्याच्या कार्यात गावातील सर्व लोकांची सर्वतोपरी मदत घेऊन सगळ्यांच्या सहकार्याने शासनाचा हा निर्णय कसा बदलता येईल, यासाठी सनदशीर मार्गाने शासन दरबारी सतत पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली.  

    यावेळी पोलीस पाटील श्री.बाबुराव चोपडेकर, पालक संघ उपाध्यक्ष नरेंद्र मोंडकर,  सागरतीर्थ ग्रामपंचायतचे सदस्य श्रीम. समृद्धी कुडव, श्रीम. मेरी फर्नांडिस, श्रीम. स्मिता फर्नांडिस, श्री. गायत्री गोडकर, श्री. रचना गोडकर श्रीम. सेजल नाईक, श्री.आत्माराम बागलकर, श्री. महेश गोडकर, श्री . मयूर आरोलकर, श्री. घनश्याम गोडकर, श्री. राजाराम बागकर, श्री. रवींद्र बागकर, श्री. त्रिवेणु चिपकर, श्री. विजय आरोलकर, श्री. सतीश फटनाईक, श्री.शंकर नाईक, श्री. बापू भानजी, श्री.कृष्णा धुरी, श्रीम.सिद्धी नरसुले, श्रीम.कार्तिकी कांबळी, श्रीम. माधुरी वराडकर, श्रीम. वेदिका गुरव, श्री. संतोष नाईक, श्री. नारायण वरगावकर, श्री . संजय भुबे इत्यादी पालक ग्रामस्थ बंधूभगिनी उपस्थित होते. शाळेचे उपाध्यक्ष श्री. नरेंद्र मोंडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सदर शाळा सध्या एक शिक्षकी होणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. तर श्री. यशवंत फटनाईक यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी ही शाळा अत्यंत महत्त्वाची असून शाळा बंद झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होईल, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed