
बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर
दिनांक: १७ जून २०२४
जिद्दीच्या जोरदार कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो हे बांदा शहरातील सिद्धी शिवानंद भिडे या सतरा वर्षीय युवतीने दाखवून दिले आहे. शालेय जीवनातच कर्करोगसारख्या असाध्य रोगाने गाठल्याने भिडे कुटुंबीय विवंचनेत होते. मात्र सिद्धीने जिद्द न सोडता या असाध्य रोगावर तेवढ्याच जिद्दीने मात केली. केवळ मातच करता ती न थांबता तिने नीट परीक्षेत ६६४ गुण मिळवत आपल्या ध्येयाला देखील गवसणी घातली.
सिद्धिने जिद्द न हारता कर्करोगसारख्या दुर्धर आजाराशी दोन हात करत मिळविलेले यश हे कौतुकास्पद असून तिच्या या यशाचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. सिद्धिचे प्राथमिक शिक्षण सावंतवाडी येथील मिलाग्री हायस्कुल मध्ये झाले आहे. जुलै २०१७ मध्ये सातव्या इयत्तेत शिकताना शाळेत करण्यात आलेल्या हिमोग्लोबिन तपासणीत तिच्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण हे ७.६ आढळले. त्यावेळी याची कल्पना पालकांना देण्यात आली. काही दिवसांनी पुन्हा हिमोग्लोबिन तपासणी केली असता ते ६.१ असल्याचे आढळले. पालकांनी याची गंभीर दखल घेत पुण्यातील खासगी रुग्णालयात आरोग्याची तपासणी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी केलेल्या विविध चाचण्यातून तिला रक्ताचा कर्करोग असल्याचे निदान झाले. तिला कॅन्सरसारख्या भयंकर आजाराचे संकट ओढवेल असे कधीही वाटले नव्हते. घरातील एकुलती एक मुलगी असल्याने तिच्यासह कुटुंबावर मोठे संकट ओढावले. ताप येणे, उलट्या होणे अशी लक्षणे आढळून आली. काही दिवसांनी शरीरातील पांढऱ्या पेशी देखील कमी झाल्या. रक्ताचा कॅन्सर असल्याने व हा रोग बरा होण्यासाठी केमोथेरपी करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. सिद्धीच्या आई-वडिलांनी देखील न डगमगता याला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला.
सलग तीन वर्षे तब्बल ३३ किमो तिला देण्यात आले. उपचार सुरु असताना देखील तिने अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. असह्य वेदनांमुळे विचलित न होता तिने आपला अभ्यास सुरूच ठेवताना आठवीत स्कॉलरशिप मिळवत सिंधुदुर्ग जिल्ह्यात १६ वा क्रमांक मिळविला. केमोथेरपी सुरु असताना तिच्या डोक्याचे केस देखील गेलेत. मात्र याही परिस्थितीत तिने शाळेत नियमित जात आपला अभ्यास पूर्ण केला. उपचार सुरु असतानाही तिने आपल्या वर्गातील अव्वल क्रमांक कधीही सोडला नाही. शाळेतील शिक्षक व सहकारी मित्र यांनी देखील या काळात सिद्धीला मानसिक आधार दिला.
२०२१ मध्ये तिने दहावी परीक्षेत ९९ टक्के गुण मिळवत सावंतवाडी तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला. यावेळीही तिच्यावर उपचार हे सुरूच होते. पुढील शिक्षण तिने वेंगुर्ले तालुक्यातील वेतोरे कॉलेज मध्ये पूर्ण केले. बारावीच्या परीक्षेत देखील तिने ८९.६७ टक्के गुण मिळवत चांगले यश संपादन केले. यादरम्यान तिने ऍलन इन्स्टिटयूट मुंबईचे ऑनलाईन क्लास देखील पूर्ण केलेत. तिचे डॉक्टर होण्याचे स्वप्न असल्याने तिने बारावीच्या अभ्यासासोबतच नीटचा अभ्यास सुरु केला. ७ मे २०२३ रोजी नीटची परीक्षा असताना एक महिना पूर्वी तिला पुन्हा त्रास सुरु झाला.
तिचा त्रास खुपच वाढल्याने जुलै २०२३ मध्ये पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु केले. त्यावेळी केलेल्या चाचण्यात ब्रेन कॅन्सरचे निदान झाल्याने पुन्हा भिडे कुटुंबीयांना धक्का बसला. जुलै २३ ते फेब्रुवारी २०२४ या आठ महिन्यांच्या कालावधीत रेडियेशन व किमोथेरपी सुरु करण्यात आली. या परिस्थितीतही तिने डॉक्टर होण्याच्या ध्येयाने सलग १४ तास अभ्यास करून पुन्हा नीट परीक्षा दिली. यावेळी मात्र तिने आपले ध्येय गाठत तब्बल ६६४ गुण मिळवत कोकणात प्रथम येण्याचा मान मिळविला.

