
दिनांक: २१ सप्टेंबर २०२५
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
श्री देवी माऊली मंदिर तळवणे येथे नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे .श्री देवी माऊली मंदिरामध्ये सर्व मंडळींच्या एकमताने एकजुटीने अनेक प्रकारचे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यातील हा एक जिल्हास्तरीय भजन स्पर्धेचा कार्यक्रम होणार आहे. श्री देवी माऊलीच्या कृपाशीर्वादाने कार्यक्रमांची व्याप्ती वर्षानुवर्षे वाढतच असते.
एका तळवणे सारख्या छोट्या गावामध्ये जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन हे युवा वर्गाचा सहभाग तसेच गावातील इतर मंडळींचा पुढाकार यामुळेच शक्य झाले आहे. दरवर्षी नवरात्रोत्सवानिमित्त अनेक स्पर्धा अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
या स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी साडेसात वाजता होणार आहे. यामध्ये श्रीदेवी माऊली भजन मंडळ सातोसे, लिंगेश्वर पावणाई प्रासादिक भजन मंडळ कणकवली, जैन महालक्ष्मी प्रासादिक भजन मंडळ वालावल, श्रीदेवी माऊली भजन मंडळ साटेली, श्री सद्गुरु प्रासादिक भजन मंडळ अणसुर, श्री देव रवळनाथ प्रासादिक भजन मंडळ पिंगुळी, श्री देव काज्रोबा भजन मंडळ कवठणी, अशा वेगवेगळ्या भजन मंडळांनी सहभाग घेतलेला आहे. या स्पर्धेचा निकाल व बक्षीस वितरण रात्री २:०० वाजता होणार आहे.
तरी या स्पर्धेस दशक्रोशीतील सर्व ग्रामस्थांनी उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी गावातील सर्व गावकऱ्यांकडून तसेच स्थानिक लोकांकडून विनंती करण्यात आली आहे.
