
संपादकीय: सिंधुदुर्ग
दिनांक: ८ जून २०२४
७ जून २०२४
मृग नक्षत्राचा पारंपरिक सोहळा निसर्गात सजवणारी ही तारीख. काळ पुढे सरकला, गावांचे उंबरे शहरांकडे सरकले, शहरांची धाव महानगरांकडे गेली, सगळे वेगानं बदलत गेलं पण पाऊस मात्र तसाच राहिला आणि याच पावसाचे सेलिब्रेशन म्हणजे सात जून.
पाऊस! ऋतुचक्रातील सर्वात देखणा सोहळा. कोसळतो, हसवतो, भिजवतो, लपतो, रुसतो, चिडतो तरी पुन्हा आठवणीने दरवर्षी दाखल होतो; असा हा पाऊस.
अवकाळी म्हणून वेळेआधी दाखल झाला तरी वर्षानुवर्षे पावसाचा आगमन सोहळा साजरा करणारा दिवस म्हणजे सात जून. ग्रामीण भागात या सात जूनचे फार महत्त्व असते. मृग नक्षत्राला ग्रामीण बोलीत ‘मिरग’ असे म्हणतात आणि या मिरगाच्या पावसाची सुरुवात गावखेड्यातल्या प्रत्येक घरात अजूनही वैशिष्ठ्यपूर्ण अशीच होते.
मृग नक्षत्राचा हा सोहळा सर्वात अगोदर निसर्ग उलगडतो. उष्णतेने तप्त झालेल्या लाल-तांबड्या-काळ्या जमिनीवर लाल भुरकट रंगाचा मृगाचा किडा दिसू लागल्यावर मृगाची शुभवार्ता निसर्गाला समजते. मग हळूहळू काजवे दिसू लागतात. वाळवीचे कीटक जमिनीवर फिरु लागतात.. निवडूंगाच्या झुडुपाला चौवदारे फुटु लागतात. जलाशयांचा रंग बदलू लागतो. आणि सुरु होतो मृगाचा सोहळा. निसर्गच कविता सादर करतो आणि प्रतिभावंताच्या शब्दातून मृगाचा पाऊस उलगडतो.
पावसाचे येणे-जाणे आता लहरी झालेय. अवकाळीच्या धिंगाण्याला काळवेळ उरला नाही. सेलिब्रेशनला कारण शोधणाऱ्या माणसांना आता कसलंही निमित्त लागतं म्हणा… पण कितीही काहीही कसंही बदललं ना तरी सात जून आणि मिरग फेस्टीवलची घराघरातील गंमत घट्ट रुतून आहे.. कॅलेंडरच्या सात तारीख लिहिलेल्या जूनच्या पानावर आणि पावसावर प्रेम करणाऱ्या मनावरही.
•••
महाराष्ट्रात यावेळी दोन दिवस अगोदरच मोसमी पावसाचं आगमन झालंय. प्रत्येकाला हवहवासा वाटणारा पाऊस आता मनसोक्त बरसू लागेल.
पावसाची मजा काही वेगळीच असते.
माणसाला स्वतःचे वय विसरायला लावून चिंब भिजायला लावणारा…
मृद् गंधाने धुंद करणारा…
वसुंधरेसह सर्वांना आनंद देणारा हा पाऊस बळीराजासह सर्वांना सुखाचे दिवस घेऊन येवो ही प्रार्थना!
