आताच शेअर करा

दिनांक: १३ जुलै २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर


    ‘बांद्याचा बाप्पा’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने येथे शुक्रवार  दिनांक १८ रोजी महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग शाखा सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या लोकोपयोगी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
   मंडळाने या आधी सलग पाच वर्षे उत्स्फुर्त सहभागाने रक्तदान शिबिर यशस्वी केले असून यंदाचे आयोजनाचे हे सहावे वर्ष आहे. दरवर्षी मंडळाचे सर्व कार्यकर्ते, व्यापारी, ग्रामस्थ, महिला शेकडोच्या संख्येने या शिबिरात सहभागी होतात. १८ रोजी व्यापारी भुवन (विठ्ठल मंदिर शेजारी) बांदा येथे सकाळी ८.३० ते दुपारी १ या वेळेत हे शिबीर होणार आहे. या शिबिरासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय रक्तपेढी व गोवा बांबोळी रुग्णालय रक्तपेढी रक्त संकलन करणार आहेत. सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून शिबीर यशस्वी करावे असे आवाहन मंडळाच्या वतीने अध्यक्ष अनय स्वार, उपाध्यक्ष आबा धारगळकर व शिबीर प्रमुख अक्षय मयेकर यांनी केले आहे.
    या शिबिरात सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठानच्या वतीने अवयवदान, देहदान याविषयी जनजागृती व मार्गदर्शन करण्यात येणार असून इच्छुक उपस्थितांचे अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. याबाबत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश तेंडोलकर हे मार्गदर्शन करणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन रक्तमित्र प्रतिष्ठानचे सदस्य निलेश मोरजकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed