
दिनांक: ८ जुलै २०२५
सिंधुदुर्ग संपादकीय: मळेवाड – कोंडुरे – देऊळवाडी येथे रविवार दि.६ जुलै रोजी दुपारी येथील चार जणांवर बिबट्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. यावेळी येथील ग्रामस्थांनी त्या बिबट्या वाघाला जेरबंद करण्याची मागणी केली होती.
दरम्यान त्या बिबट्या वाघाला २४ तासांच्या आत वनविभागाच्या पथकाने येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने अथक प्रयत्नानंतर आज सोमवार दि. ७ जुलै रोजी सायंकाळी ६.०० वाजता जेरबंद केले.
सदर बिबट्या परिसरातील बागेमध्ये लपून बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती.तसेच जवळच नदी वाहत असल्याने बिबट्या तेथेच असण्याची शक्यता वर्तवली गेली.दरम्यान सदर बिबट्या वाघ नदी जवळील पंपाच्या शेडमध्ये लपल्याचे निदर्शनास आले.
यावेळी ग्रामस्थांच्या सहकार्याने तब्बल १० तासानंतर त्या वाघाला पिंजऱ्यात कैद करण्यात वनविभागाला यश आले.
या मोहिमेत वनक्षेत्रपाल सुहास पाटील,आजगाव वनपाल पृथ्वीराज प्रताप,प्रमोद राणे तसेच सावंतवाडी जलद कृती दलाचे कर्मचारी सहभागी झाले होते.
