
दिनांक: ११ जून २०२५
गोवा: (पेडणे प्रतिनिधि) पेडणे आदर्श युवा संघ आणि उदरगत मांद्रे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पेडणे कबड्डी लीग दुसऱ्या हंगामाचे विजेतेपद किंग्स युनाइटेड संघाने पटकवले. त्यांना रोख चाळीस हजार आणि चषक तर उपविजेत्या साईशक्ती संघाला रोख वीस हजार व चषक देण्यात आले.
सावळवाडा इनडोअर स्टेडियमवर आयोजित कबड्डी लीगमध्ये ऐकूण सहा संघ सहभागी झाले होते.
अटीतटीचा अंतिम सामना युनाइटेड किंग्स आणि साई शक्ती यांच्यात ४१ – ४१ गुणांनी ड्रॉ झाला. सुपर पाच रेडमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत किंग्स युनायटेड संघाने हा सामना ४७ – ४५ अशा फरकाने जिंकला.
साखळी पद्धतीने खेळविण्यात आलेल्या या लीगमध्ये युनाइटेड किंग्सने सर्व सामने एकतर्फी जिंकले होते. पण अंतिम सामन्यात साई शक्ती संघाने पहिल्या मध्यापर्यंत २४ – १० अशा गुण फरकाने आघाडी घेतलेली. परंतु युनाइटेड किंग्स संघाचा रेडर कर्णधार भार्गव मांद्रेकरच्या जिगरबाज खेळाच्या जोरावर संपूर्ण सामना पलटला. पूर्ण वेळेपर्यंत ऐकूण ३१ रेड पॉईंट्सची कमाई करीत युनाइटेड किंग्स संघाने हा सामना ४१ – ४१ असा अनिर्णीत स्थितीत आणून सोडला.
पिकेएल सीजन दोनमध्ये भार्गव मांद्रेकरने ऐकूण ६५ रेड पॉईंट्सची कमाई केली व पाच सामन्याचा सामनावीर पुरस्कार पटकवण्याचा विक्रम केला. त्याच्या या तुफानी खेळीबद्दल भार्गव मांद्रेकर याला पिकेएल सीजन दोनचा मालिकावीर म्हणून मांद्रे मतदार संघांचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
तसेच स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई म्हणून हरीश जल्मी आणि उत्कृष्ट पकड म्हणून रामा वेळीप यांना गौरविण्यात आले.
