
दिनांक: १५ ऑक्टोबर २०२५
बांदा प्रतिनिधी: ओंकार हत्ती मडूरा येथे थैमान घालत असून भात पिकाचे नुकसान करत आहे.तयार झालेले भात पिक हत्तीच्या भीतीमुळे कापता येत नाही.शेतकरी भात कापणी साठी आपल्या शेतीत उतरण्यास घाबरत आहे. यावेळी गावातील काही सुजाण नागरिकांनी वनविभागाचा पुन्हा एकदा दरवाजा ठोठवण्याचा प्रयत्न केला. सावंतवाडी येथील वनविभागाच्या कार्यालयात जाऊन उप वनविभाग अधिकारी मिलेश शर्मा यांच्या समोर आपल्या समस्या मांडण्यात आल्या. यावेळी कास व मडूरा गावचे शेतकरी उपस्थित होते. प्रथम कास गावच्या वतीने सरपंच प्रवीण पंडित यांनी नुकसान भरपाई कशा पद्धतीने देणार असा प्रश्न विचारत अधिकाऱ्याला घेराव घातला. नियम व अटी शिथिल करून सरसकट नुकसान भरपाई द्यावी असे आपले म्हणणे शेजाऱ्यांच्या वतीने मांडले.शेतकऱ्यांची भात कापणी सुरू झाली असून त्यांना कशा प्रकारे संरक्षण देणार? असा प्रश्न प्रवीण उर्फ पिंट्या परब यांनी उपस्थित केला. तसेच हत्ती जेलबंद कधी करणार अशी मागणी शेतकऱ्यांनी वर्णी लावून धरली.,प्रशासनाची परवानगी मिळाली काय? असेल तर त्याची कॉपी आम्हाला द्यावी असे उल्हास परब यांच्या सह सर्व शेतकऱ्यांनी व ग्रामस्थानी मागणी केली. असे अनेक प्रश्नांना ग्रामस्थानी वाच्या फोडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी उपवनविभाग अधिकारी मिलेश शर्मा म्हणाले की आमची ओंकार हत्तीला पकडण्याची पूर्ण तयारी झाली आहे. काही तांत्रिक गोष्टी आहेत ते काही दिवसात पूर्ण होतील. त्यानंतर भात कापण्यासाठी शेतकऱ्याला पूर्ण सहकार्य केले जाईल.वनविभागाचे वनरक्षक भात कापणीच्या वेळी आपल्यासोबत उभे राहून आपल्याला संरक्षण देण्याचे काम करतील. शासनाची परवानगी आलेली आहे. काही दिवसात त्याची कॉपी आपल्याला सुपूर्त करण्यात येईल. नुकसान भरपाईचे नियम शासनाच्या अत्यारित राहून शिथिल करण्यात येतील व शेतकऱ्याचे झालेली नुकसानाची भरपाई देण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्याकडून देण्यात आले. यावेळी कास सरपंच प्रवीण पंडित व कास ग्रामस्थ, मडूरा गावचे प्रवीण (पिंट्या) परब, उल्हास परब, मंदार परब , काशिनाथ परब , बंटी परब, अमोल गावडे, नितीन धुरी, आनंद चुनाळेकर , आणि गावचे शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.