
दिनांक: १२ ऑक्टोबर २०२५
सावंतवाडी:राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी रामराज्य म्हणून गौरविलेल्या सावंतवाडी संस्थानच्या गंजिफा कलेला भारतीय पोस्टाच्या तिकिटावर सन्मान मिळाल्यामुळे सावंतवाडी संस्थानसह गंजिफा कलेचा इतिहास देश आणि परदेशात प्रचार व प्रसार होण्यास मदत होईल असा विश्वास सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेमसावंत भोसले यांनी व्यक्त केला.
सावंतवाडी संस्थानच्या गंजिफा कलेला विशेष पोस्ट तिकिटावर स्थान देत भारतीय टपाल विभागाने या कलेचा सन्मान केल्याबद्दल श्रीमंत शिवमराजे भोसले नागरी सहकारी पतसंस्थेच्यावतीने सावंतवाडी संस्थानचे राजे श्रीमंत खेमसावंत भोसले आणि श्रीमंत सौ. शुभदादेवी भोसले यांची भेट देण्यात आली. त्यावेळी खेमसावंत बोलत होते. यावेळी श्रीमंत शिवरामराजे भोसले पतसंस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डी. टी. देसाई, संस्थेचे संचालक एल. एम. सावंत, प्रा. सौ. रमा सावंत, प्रा. राठोड, प्रा. आर. बी शिंत्रे, सल्लागार अँड शामराव सावंत, व्यवस्थापक सौ. सुहासिनी राऊळ आदी उपस्थित होते.
यावेळी सौ. शुभदादेवी भोसले यांनी १६ व्या शतकात भारतात उदयास आलेल्या सावंतवाडी संस्थानची गंजिफा कला पोस्ट कार्डच्या माध्यमातून देशोदेशी पोहोचणार असुन सावंतवाडीसाठी ही अभिमानाची बाब आहे. आता गंजिफा कलावंतांना शासनाने या कलावंतांना राजाश्रय देण्याची गरज असल्याचे सांगितले. यावेळी डी. टी प्रा. देसाई यांनी श्रीमंत राजमाता सत्वशीलादेवी भोसले यांनी गंजिफा कलेसाठी दिलेले योगदान आणि त्यांनी त्यासाठी घेतलेले परिश्रम याबाबत अनुभव कथन केले. तसेच राजमाता यांनी गंजिफा बनावणारे कलाकार कसे घडवले याचाही आढावा घेतला.