दिनांक: १७ एप्रिल २०२५
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
श्री गजानन देवस्थान रेडी येथील गणपतीचा ४९ वा वाढदिवस समारंभ १८ एप्रिल २०२५ रोजी साजरा होत आहे. श्री गणेश मंदिर रेडी येथील गणपतीचा इतिहास तर संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. श्री गणेश मंदिर हे कोकणातील एक पवित्र स्थान मानले जाते. आणि संकष्टी दिवशी व इतर दिवशी भाविक भक्तांची अलोट गर्दी असते. अशाप्रकारे हा रेडी येथील श्री गणेश सर्व भाविक भक्तांच्या हाकेला धावतो नवसाला पावतो. अशी या गणपतीची कोकणात ख्याती आहे. ही पांडवकालीन काळात दगडामध्ये कोरलेली गणेश मूर्ती असून भाविकांची येथे गर्दी दिवसा दिवस वाढत चालली आहे. श्री गणेश मंदिराच्या बाजूला सुंदर असा समुद्र किनारा, चारी बाजूने निसर्गरम्य वातावरण आणि अशाप्रकारे निसर्गाच्या सानिध्यात वसलेल हे श्री गणेश मंदिर.
या वाढदिवसाच्या सोहळ्यानिमित्त अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी श्री गणेश मंदिरात अभिषेक होईल. तसेच सकाळी आठ वाजता श्री सत्यविनायक महापूजा होईल दुपारी आरती, महाप्रसाद व रात्री आठ वाजता स्थानिकांची भजने होतील. त्यानंतर नाईक मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा दणदणीत नाट्यप्रयोग सादर केला जाईल.
तरी सदर कार्यक्रमास सर्व भाविकांनी उपस्थित राहून श्री गणरायाचे दर्शन घ्यावे असे आवाहन श्री देव गजानन देवस्थान ट्रस्ट, रेडी व स्थानिक ग्रामस्थानकडून करण्यात आले आहे.
