
सिंधुदुर्ग : संपादकीय
दिनांक:२९ ऑक्टोंबर २०२४
सावंतवाडी तालुक्यातील सरमळे सारख्या दुर्गम मागासलेल्या खेड्यात एका गरिब दलित कुटुंबात जन्म होऊनही असंख्य अडचणी, अडथळे व संकटांवर मात करुन उच्च शिक्षण घेत थेट इंग्रजीतुन लेखन करुन जागतिक साहित्यात आपले नाव कोरण्याचे अत्यंत स्वप्नवत कार्य अनिल जिजाबाई कांबळे यांनी केले आहे.
आपल्या लेखनातून त्यांनी नेहमीच भव्य विषय निवडले आहेत. तरीही आपली बुद्धिमत्ता आणि प्रतिभेच्या जोरावर त्यांनी महाकवी ज्ञानेश्वर यांचे काव्य आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान विचारसंचिताचा स्वर आपल्या सर्जनशील लेखनातून जागतिक साहित्यात उमटविला आहे.
कविता, कथा, कादंबरी, नाटक, समीक्षा इत्यादी सर्व साहित्य प्रकारांमधुन लेखन असूनही तसेच अनिल कांबळे हे आजच्या उत्तर – आधुनिक साहित्य प्रवाहातील, शैलीतील तरूण भारतीय इंग्रजी लेखक म्हणुन ओळखले जात आहेत. त्यांनी आपली मुळे न सोडता अप्रत्यक्षपणे या विचारांचा एक सतत ऐकू येणारा ध्वनी जिवंत ठेवला आहे. म्हणुनच अनिल संत ज्ञानदेव व युगपुरुष डॉ. आंबेडकर यांच्या काव्याचा विचारांचा जागतिक साहित्यातील समर्थ वारसदार ठरतो आहे. असे उद्गार ज्येष्ठ विचारवंत व अमेरिकेतील फ्लोरिडा युनिव्हर्सिटी येथील प्रोफेसर डॉ. अनुराग अगरवाल यांनी अनिल यांच्या लेखनाबद्दल काढले आहेत.
मराठी माध्यमातून शिक्षण घेत पुढे इंग्रजी लेखनाची आवड असल्याने इंग्रजी स्पेशल विषय निवडुन अनिल यांनी भारतीय व जागतिक इंग्रजी साहित्याचा व्यासंग केला आहे. पुढील वाटचालीसाठी इंग्रजीतुन लेखन सुरु केले. खरे तर भारतीय इंग्रजी साहित्यात भारतातील उच्चभ्रू वर्गातील उच्च वर्णीय, इंग्रजी भाषा वर्तुळातील अभिजन वर्गाचे वर्चस्व आहे. मात्र तरिही तळागाळातल्या दुर्गम भागातून येणाऱ्या अनिल कांबळे सरमळकर यांनी मोठ्या जिद्दीने कष्टाने अथक प्रयत्न करुन भारतीय इंग्रजी साहित्यातच नव्हे तर जागतिक इंग्रजी साहित्यात व जागतिक रंगभूमीवर त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे. हे सारेच फार विस्मयकारक, प्रेरणाकारक आहे असे अनिल यांच्याबद्दल बोलताना भारतीय वंशाच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातील लेखिका व फिलॉसॉफर अमिआ श्रीनिवासन म्हणाल्या आहेत.
अनिल यांचे कविता, कादंबरी, नाट्यलेखन व समीक्षालेखन अमेरिकेतील आणि युरोपातील अनेक विद्यापीठात पोहोचले असुन अनेक विद्वान विचारवंत प्रोफेसर्स समीक्षक इत्यादींनी अनिल यांच्या लेखनाचे कौतुक केला आहे.
एकूणच संपूर्ण जग हिंसा, युध्द, अराजक आणि अलोकशाहीच्या, हुकुमशाहीच्या आवर्तात सापडले आहे. अशा काळात अनिल यांची नाटके व इतर लेखन संपूर्ण मानवजातीच्या अस्तिवाबद्दल बोलत आहेत आणि या लेखनात तेवढेच साहित्यिक प्रायोगिक व कलात्मक सामर्थ्य आहे. हे लेखन केवळ थेट विचार किवा एख्याद्याच विचारसारणीचे कट्टर समर्थन करत नसुन अनिल यांच्या लेखनात एकूणच मानवी समाजाच्या भविष्याबद्दलचे हादरवून टाकणारे व अंतर्मुख करणारे चिंतन आहे..अर्थातच अनिल यांची प्रेरणा आणि पाया थोर मराठी कवितेची परंपरा आहेच विशेषता महाकवी ज्ञानेश्वर हे त्यांचे काव्यपरंपरेतील अढळ श्रध्दास्थान आहे .परंतु त्यांच्यामागे आंबेडकर विचारांचे विराट संचित उभे आहे. अर्थातच आंबेडकर विचारांचे नवे सौंदर्यशास्त्र जन्माला घालण्याची ताकद अनिल यांच्या लेखनात आहे.
” अनिलने आंबेडकरांचे विचार जागतिक साहित्यात पोहचविले आहेत. या लेखनात जे खोलवर उतरलेले कलामूल्य आहे त्याबद्दल मी एकच म्हणेन की “अनिल इज वन ऑफ द आंबेडकर्स इन आर्ट्स” असे उद्गार इंग्लंड येथील लीड्स युनिव्हर्सिटीतील ज्येष्ठ विचारवंत कला समीक्षक, प्रोफेसर जॉन ब्रेट यांनी काढले आहेत.
The fox, Its Already Tomorrow, Vulture Whisper, Aristotle Breakup, End of Era, Dark Age, ही नाटके Death of Arts व Enemy Of America ही वैचारीक पुस्तके व I feel Nothing, Passages of Passive हे इंग्रजी कवितासंग्रह Broken Earth Broken Minds ही कादंबरी इत्यादी लेखनामुळे अनिल कांबळे सरमळकर आज वैश्विक साहित्याच्या क्षितीजावर आले आहेत. म्हणुनच अमेरिकेतील येल युनिव्हर्सिटीतील ज्येष्ठ इंग्रजी प्रोफेसर जॉन ॲडम्स अनिल यांच्या लेखनाबद्दल बोलतांना म्हणतात ” पुर्व व पश्चिमेच्या बुद्धी व प्रतिभेचा सुंदर मिलाफ अनिलमध्ये आहे तो त्याच्या लेखनामध्ये जाणवतोय..एक दिवस अनिलचे लेखन नोबेल प्राईजचे दार ठोठावेल असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.
तथापि अनिल जिजाबाई कांबळे- सरमळकर यांना इथवर पोहचण्यासाठी आपल्या संघर्षमयी जीवनात खुप खडतर प्रवास करावा लागला आहे. या प्रवासात त्यांना असंख्यवेळा उपेक्षा, कुचेष्टा,अपमान, षडयंत्रे आणि नियोजितपणे केलेल्या बदनामीला एकट्याला सामोरे जावे लागले आहे. हा त्यांचा संघर्ष आजही संपलेला नाही.
कविता कादंबरी नाटक समीक्षा चित्रपटलेखन दिग्दर्शन अशा अनेक क्षेत्रात ते अहोरात्र काम करत असताना तत्वज्ञानाचाही व्यासंग करत आहेत. स्वतःबदल बोलताना ते म्हणतात ” मला हे सातत्याने काम करायचे आहे. आणि पुढेही मला माझ्या लेखणीच्या जोरावर अधिक प्रयत्न करायचे आहेत.



फ्लोरिडा विद्यापीठ
प्रोफेसर, ज्येष्ठ विचारवंत

लीड्स विद्यापीठ,
कला समीक्षक, विचारवंत

लेखिका, फिलॉसॉफर
ऑक्सफर्ड विद्यापीठ.
