सिंधुदुर्ग / संपादकीय
दिनांक: २६/१०/२०२४
मानव साधन विकास संस्था, अंतर्गत परिवर्तन केंद्रा मार्फत माजी केंद्रीय मंत्री माननीय श्री. सुरेशजी प्रभू यांचे प्रेरणेतुन, माननीय सौ. उमा प्रभू विद्यमान अध्यक्षा, मानव साधन विकास संस्था यांनी महिलांच्या उपजीविका वृद्धीसाठी, वृद्धी प्रोजेक्ट मार्फत आय.सी.आय.सी.आय.फाउंडेशनच्या सहकार्याने व राष्ट्रीय स्तरावरील फॅशन टेक्नाॅलाॅजी संस्थेतील सुपर ट्रेनर्स च्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पन्नास महिलांना प्रथमच नाविन्यपूर्ण ‘अपसायकलिंग टेक्सटाइल’ मधील मास्टर ट्रेनर्स म्हणून वर्षभर प्रशिक्षण दिले असून, या मास्टर ट्रेनर्सनी कोकणातील साडे चारशे महिलांना ‘अपसायकलिंग टेक्सटाइल’ या क्षेत्रात प्रशिक्षीत केले आहे. पर्यावरणास हानी पोहोचवणाऱ्या व अनावश्यक समजल्या जाणाऱ्या टेक्सटाईल पासून विविध डिझाइन्स करून वापरयोग्य कलात्मक उत्पादनांची निर्मिती करणे म्हणजेच वृद्धी प्रकल्प! हा प्रकल्प पर्यावरणपुरक असुन सिंधुदूर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील पाचशे प्रशिक्षीत टेक्स्टाईल डिझायनर महिलांनी साडी, टाॅप, ज्वेलरी, स्टेशनरी, काॅर्पोरेट गिफ्ट्स अश्या विविध प्रकारातील सुमारे तीनशेहून जास्त कलात्मक डिझाईनमधील नित्योपयोगी उत्पादनांची निर्मिती केली आहे. सदर उत्पादनांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असुन यांतून ग्रामीण भागातील हजारो महिलांना स्वयंरोजगार निर्माण होणार आहे. महिलांच्या उपजिविका क्षमतेत वाढ व्हावी हे मानव साधन विकास संस्थेचे नेहमीच लक्ष्य राहिले आहे व प्रशिक्षण पश्च्यात सहकार्याचा भाग म्हणून संस्थेमार्फत ‘अमेझिंग गोवा २०२४’ या आंतरराष्ट्रीय एक्स्पोमध्ये महिलांच्या ‘अपसायकलिंग टेक्सटाइल’ निर्मित उत्पादनांना मार्केटसंधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. लवकरच याक्षेत्रातील विविध उत्पादने निर्मितीचा कारखाना सिंधुदूर्गात सुरू करण्याचा प्रशिक्षीत महिलांचा मानस आहे. जागतिक पातळीवर नाविन्यपूर्ण समजली जाणारी ‘अपसायकलिंग टेक्सटाईल’ ही संकल्पना कोकणात रूजविणे व त्यांतून महिलांसाठी स्वयंरोजगार निर्माण करण्यास मानव साधन विकास संस्थेची परिवर्तन केंद्रे यशस्वी ठरली आहेत.