दिनांक:१९/११/२०२६
तळवणे प्रतिनिधी – शंकर गावडे
ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्या सुप्त गुणांना प्रोत्साहन मिळावे आणि गावातील सांस्कृतिक परंपरा जपल्या जाव्यात, या उद्देशाने तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तळवणे थंडर क्रिकेट क्लब व नवयुवक नाट्य संपदा, तळवणे यांच्या संयुक्त विद्यमाने १९ व २० नोव्हेंबर २०२६ रोजी या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी, १९ नोव्हेंबर रोजी परशुराम भारती महाराज मठ, तळवणे येथे महिलांसाठी रांगोळी स्पर्धा, पाककला स्पर्धा आणि भारतीय पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांच्या कलात्मकतेला, पाककौशल्याला आणि पारंपरिक संस्कृतीला प्रोत्साहन देणे हा या स्पर्धांचा मुख्य हेतू आहे.
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे ‘खेळ पैठणीचा’ हा मनोरंजक कार्यक्रम असून, त्याचे सूत्रसंचालन बादल चौधरी करणार आहेत.
दुसऱ्या दिवशी, २० नोव्हेंबर रोजी श्री देव रवळनाथ मंदिर रंगमंच, तळवणे येथे खुल्या सोलो नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी तळवणे मर्यादित पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धांची आकर्षक पारितोषिके
१. रांगोळी, पाककला व पारंपरिक वेशभूषा स्पर्धा
* प्रथम क्रमांक – ३,००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र
* द्वितीय क्रमांक – २,००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र
* तृतीय क्रमांक – १,००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र
२. खुली सोलो नृत्य स्पर्धा
* प्रथम क्रमांक – १०,००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र
* द्वितीय क्रमांक – ८,००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र
* तृतीय क्रमांक – ६,००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र
* तीन उत्तेजनार्थ पारितोषिके – प्रत्येकी २,००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र
३. पर्यावरणपूरक आकाशकंदील स्पर्धा
* प्रथम क्रमांक – ३,००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र
* द्वितीय क्रमांक – २,००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र
* तृतीय क्रमांक – १,००० रुपये, ट्रॉफी व प्रमाणपत्र
गावातील सर्व वाड्यांमधील नागरिकांचा सहभाग वाढावा, युवकांना सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये एकत्र आणता यावे तसेच महिलांना स्वतःचे कौशल्य सादर करण्याची संधी मिळावी, या सकारात्मक दृष्टिकोनातून आयोजकांनी या महोत्सवाचे नियोजन केले आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी आयोजक मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ मेहनत घेत आहेत. तळवणे व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा आणि स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन तळवणे थंडर क्रिकेट क्लब व नवयुवक नाट्य संपदा, तळवणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

