
दिनांक:१८/११/२०२६
बांदा:प्रतिनिधी:
विलवडे गावात क्वारी आणि क्रशरना यापुढे ना हरकत दाखला देऊ नये,असा महत्वपूर्ण ठराव मंगळवारी दुपारी झालेल्या विलवडे ग्रामपंचायतीच्या खास ग्रामसभेत घेण्यात आला. विलवडे गावात क्वारी आणि क्रशरना ना हरकत दाखला देण्याबाबत विलवडे शाळा नं.१ च्या सभागृहात झालेल्या या ग्रामसभेला २०० ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.यावेळी सरपंच प्रकाश दळवी,उपसरपंच विनायक दळवी,तलाठी केतन कांबळे,पोलीस पाटील दीपक नाईक,बिट हवालदार श्री.तेली,ग्रामपंचायत सदस्य गणेश दळवी,नारायण दळवी, शिल्पा धर्णे, भावना’ सावंत,लिपिक नाईक उपस्थित होते.क्वारींच्या ब्लास्टिंगमुळे गावातील घरांना तडे जाऊन मोठे नुकसान झाले आहे.तसेच या ब्लास्टिंगमुळे पाण्याची टंचाई भासणार आहे.क्रशरमुळे शेती,बागायतीचे नुकसान होत असल्यामुळे नवीन क्रशर व क्वारींना परवानगी देऊ नये आणि ग्रामपंचायतने यापूर्वी क्रशर व क्वारींना दिलेला ना हरकत दाखला रद्द करावा,अशी मागणी माजी उपसभापती कृष्णा गुणाजी सावंत,आनंद लक्ष्मण दळवी,प्रदीप दळवी,विलास गणपत सावंत,विलास गावडे यांच्यासह उपस्थित ग्रामस्थ व महिलांनी केली.तब्बल पावणेतीन तास चाललेल्या या ग्रामसभेत महिला वर्गाचीही उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी विनायक दळवी, नंदकिशोर दळवी, कालिदास दळवी, गुणाजी दळवी यांनीही मनोगत व्यक्त केले.
