
दिनांक:१८/११/२०२६
तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे
केळूस येथील ‘आकाश फिश मिल’ कंपनीच्या मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे हुमरमळा, माड्याचीवाडी आणि आंदुर्ले या तीन गावांतील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
🔸 काय आहे नेमकी समस्या?
मासळी वाहून नेणाऱ्या गाड्यांमधून अत्यंत घाण आणि दुर्गंधीयुक्त पाणी थेट रस्त्यावर सांडत आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली असून स्थानिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. कंपनीला वारंवार सांगूनही कोणतीही कारवाई झालेली नाही.
🔸 प्रशासनाला इशारा:
हुमरमळा सरपंच अमृत देसाई आणि माजी पं. स. सदस्य अतुल बंगे यांनी शिष्टमंडळासह निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. तातडीने कारवाई न झाल्यास पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा अतुल बंगे यांनी दिला आहे.
निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी योग्य कारवाईची ग्वाही दिली असली, तरी प्रत्यक्षात या दुर्गंधीपासून सुटका कधी होणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे!
