
दिनांक: ०७/०५/२०२६
सावंतवाडी:श्री वंसदेव ब्राह्मण देवस्थान, रेखवाडी-सातोसे येथे मंदिराच्या जीर्णोद्धार वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त दि. 3 व 4 मे 2026 रोजी विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भारतमातेच्या रक्षणासाठी प्राणांचे बलिदान देणाऱ्या पंडित परिवारातील शहीद वीर जवानांचा मरणोत्तर सन्मान करण्यात आला, हा सोहळ्याचा मुख्य गौरवबिंदू ठरला.
*दोन दिवसीय कार्यक्रमाची रूपरेषा:*
*दि. 3 मे 2026 रोजी* सकाळी अभिषेक, सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. दुपारी स्थानिक कलाकारांचे भजन, महिलांची पारंपरिक फुगडी व रात्री दशावतारी नाट्यप्रयोग संपन्न झाला.
*दि. 4 मे 2026 रोजी* सकाळी क्रीडा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी ‘खेळ पैठणीचा’ व स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. रात्री मान्यवरांचा सत्कार समारंभ व पारंपरिक गोंधळाचा कार्यक्रम संपन्न झाला.
*शहीद जवानांना अश्रूपूर्ण मानवंदना:*
देशसेवेचे व्रत घेऊन सीमेवर लढताना वीरमरण प्राप्त झालेल्या व बलिदान देणाऱ्या पंडित परिवारातील जवानांचा मरणोत्तर गौरव करण्यात आला. शहीद सहदेव हरी पंडित यांचा मरणोत्तर सन्मान त्यांच्या वीरपत्नी श्रीम. सरस्वती सहदेव पंडित यांनी स्वीकारला. यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले. तसेच स्वर्गीय भगवान हरी पंडित, स्वर्गीय विश्वनाथ अर्जुन पंडित आणि स्वर्गीय वसंत पुंडलिक पंडित या वीर जवानांनी देशरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून त्यांनाही मरणोत्तर सन्मान प्रदान करण्यात आला.
*मान्यवरांची उपस्थिती व सत्कार:*
या कार्यक्रमास शिवसेना जिल्हाध्यक्ष मा. संजू परब, आरोंदा मतदार संघाचे जि.प. सदस्य मा. सुदन कवठणकर, सातार्डा मतदार संघाचे पं.स. सदस्य मा. उदय पारिपत्ये, गोवा येथील माजी मुख्याध्यापक मा. भिकाजी धुरी, सामाजिक कार्यकर्ते मा. श्रीकृष्ण भोगले व विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मा. अर्जुन सखाराम पंडित व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी अथक परिश्रम घेणारे सर्वश्री रमाकांत रावजी पंडित, अशोक विश्राम पंडित, अक्रूर रामचंद्र पंडित, शंभा सावळाराम पंडित, रमेश शांताराम पंडित, काशिनाथ बाबलो पंडित, शांताराम बाळकृष्ण पंडित व मधुकर आबा पंडित यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल-श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून पंडित परिवाराचे नाव उज्वल करणारे श्री. दीपक भगवान पंडित व श्री. सचिन दिगंबर पंडित यांचाही विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्वस्त मंडळाचे सचिव श्री. जगन्नाथ पंडित यांनी केले, तर खजिनदार श्री. मनोज पंडित यांनी मान्यवरांचे स्वागत केले. श्री. शंभा पंडित यांनी आभार मानले.
*अध्यक्षीय मनोगत:*
विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मा. अर्जुन सखाराम पंडित म्हणाले, “देवस्थान हे केवळ पूजाअर्चेचे स्थान नसून समाजप्रबोधन व राष्ट्रभक्तीचे केंद्र असले पाहिजे. आपल्या गावच्या मातीतील वीरपुत्रांनी देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान पुढील पिढीला कळावे, त्यांच्यात देशभक्तीची भावना जागृत व्हावी, हाच या मरणोत्तर सन्मान सोहळ्यामागील प्रामाणिक हेतू आहे. ‘देशसेवा हीच खरी ईश्वरसेवा’ हा संदेश आम्ही या माध्यमातून देत आहोत.”
