आताच शेअर करा

दिनांक: २४/०३/२०२६

रत्नागिरी: भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) -केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था (ICAR-CIFE), मुंबई आणि भारतीय कृषी सांख्यिकी संशोधन संस्था (ICAR-IASRI), नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने “किसान सारथी 2.0: सुधारणा, संचालन, देखभाल आणि सहाय्य” या प्रकल्पांतर्गत किसान आणि मच्छीमार मेळ्याचे आयोजन केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था (ICAR-CIFE), मुंबई येथे करण्यात आले. हा दोन दिवसीय मेळावा दि. २० व २१ मार्च, २०२६ रोजी आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeitY) आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन (DIC), नवी दिल्ली यांच्या सहकार्याने आणि यांच्याकडून प्राप्त झालेल्या निधीतून राबविण्यात येत आहे.
या दोन दिवसीय कार्यक्रमात एकूण ५०० लोक सहभागी झाले होते , या सहभागातून उपस्थितांचा उत्साह दिसून येत होता. पहिल्या दिवशी ३०० सहभागी उपस्थित होते, ज्यामध्ये केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था, मुंबई येथील शास्त्रज्ञ कर्मचारी, विद्यार्थी, वरिष्ठ संशोधन फेलो (SRF), यंग प्रोफेशनल (YP), केंद्रीय समुद्री मत्स्य संशोधन संस्था (ICAR-CMFRI), कोचीन येथील डॉ. साजू जॉर्ज, डी. वाय. पाटील विद्यापीठ, नवी मुंबई आणि मत्स्य महाविद्यालय, रत्नागिरी येथील प्राध्यापक, तसेच “किसान सारथी 2.0” प्रकल्पाची नवी दिल्लीतील टीम (डॉ. संजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली) सहभागी झाली. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे श्री. अंकित जैन आणि श्री. सुधीर कुमार (YP) देखील सहभागी झाले. ICAR-CIFE च्या विविध केंद्रांमधील कर्मचारी आणि ICAR मत्स्य संस्थांचे नोडल अधिकारी ऑनलाईन माध्यमातून सक्रिय सहभाग नोंदवत होते.
दुसऱ्या दिवशी मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे आणि पालघर या महाराष्ट्र राज्याच्या किनारी जिल्ह्यांतील १२५ मच्छीमार आणि मच्छीमार महिला सहभागी झाल्या. त्यांच्यासोबत ७५ मत्स्य क्षेत्रातील इतर भागधारकांनीही सहभाग घेतला.
हा कार्यक्रम २१ मार्च २०२६ रोजी ICAR-CIFE च्या कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी आणि २१ मार्च २०२६ रोजी मच्छीमार, मच्छीमार महिला, मासे विक्रेते, मत्स्यशेती करणारे आणि इतर हिइतर भागधारकांसाठी आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात ICAR-CIFE, मुंबई येथील मत्स्य अर्थशास्त्र, विस्तार आणि सांख्यिकी विभागाच्या प्रमुख व प्रधान शास्त्रज्ञ डॉ. अर्पिता शर्मा यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांनी उपस्थितांचे स्वागत करून किसान सारथी उपक्रमाचे महत्त्व स्पष्ट केले.
यानंतर ICAR-IASRI, नवी दिल्ली येथील प्रकल्प प्रमुख डॉ. संजीव कुमार यांनी “किसान सारथी 2.0” या प्रकल्पाचे उद्दिष्ट, वैशिष्ट्ये आणि फायदे यावर सविस्तर माहिती दिली.
ICAR-CIFE, मुंबईचे संचालक डॉ. एन. पी. साहू यांनी उपस्थितांना संबोधित करताना अशा उपक्रमांद्वारे मत्स्यशेती करणारे आणि मच्छीमार यांना डिजिटल साधने व वैज्ञानिक ज्ञानाच्या माध्यमातून सक्षम करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र राज्य मच्छीमार सहकारी संघ मर्यादित, मुंबई यांच्या अध्यक्षा सौ. ज्योती राजेश मेहर यांनी मच्छीमारांना वेळेवर माहिती उपलब्ध करून देणे, संस्थात्मक संबंध बळकट करणे आणि शाश्वत विकास साधणे यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचे महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर मुंबई जिल्हा मच्छीमार मध्यवर्ती सहकारी संघ मर्यादितचे अध्यक्ष श्री. रामदास पांडुरंग सांधे यांनी मच्छीमारांना भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकत किसान सारथी 2.0 सारख्या उपक्रमांचे महत्त्व सांगितले.
दोन्ही दिवशी तांत्रिक सत्रांचे आयोजन करण्यात आले, ज्यामध्ये सहभागी आणि “किसान सारथी 2.0” प्रकल्प टीम यांच्यात संवाद झाला. किसान सारथी मोबाईल अॅप आणि विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच या साधनांचा कृषी आणि मत्स्य क्षेत्राच्या विकासासाठी कसा उपयोग करता येईल याचे मार्गदर्शन करण्यात आले.
किसान सारथी पोर्टलचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. प्ले स्टोअरमधून अॅप डाउनलोड करणे, नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे आणि पोर्टलद्वारे प्रश्न विचारणे याची टप्प्याटप्प्याने” माहिती देण्यात आली. अॅपमधील विविध वैशिष्ट्ये प्रत्यक्ष दाखवून उपस्थितांना त्याबाबतचा प्रत्यक्ष अनुभव देण्यात आला.
ICAR-CIFE प्रकल्प टीमने किसान सारथी पोर्टलमध्ये मत्स्य क्षेत्राशी निगडित विकसित केलेल्या विविध डोमेनचे सादरीकरण करण्यात आले आणि “किसान सारथी पोर्टलची कार्यक्षमता आणि वापर अनुभव सुधारण्यासाठी सहभागींकडून मौल्यवान अभिप्राय आणि सूचना गोळा करण्यात आल्या.”.
कार्यक्रम बहुभाषिक स्वरूपात पार पडला. डॉ. परोमिता बॅनर्जी सावंत यांनी इंग्रजी व हिंदी भाषेत सादरीकरण केले, तर संशोधक विद्यार्थी श्री. भालचंद्र नाईक यांनी मराठीत सूत्रसंचालन केले.
ICAR-CIFE च्या आयोजन टीममध्ये डॉ. अर्पिता शर्मा, डॉ. परोमिता बॅनर्जी सावंत, डॉ. सिकेंद्र कुमार, डॉ. सुनील नायक, डॉ. सलोनी शिवम, श्री. सिमंत कुमार, श्री. निशांत कुमार तसेच विद्यार्थी समन्वयक विजेंद्र कुमार, स्वीटी कुमारी, रोहित कुमार श्रीवास्तव, श्रेया कुमारी आणि प्रिया कुमारी यांचा समावेश होता.
कार्यक्रमाचा समारोप ICAR- केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था, मुंबई येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सुनील कुमार नायक यांनी आभार प्रदर्शनाने केला. त्यांनी केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था संचालक डॉ. एन. पी. साहू, सर्व मान्यवर, IASRI आणि डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन टीम, ICAR- केंद्रीय मत्स्यकी शिक्षण संस्था कर्मचारी व विद्यार्थी, मच्छीमार, मच्छीमार महिला आणि सर्व सहभागी यांचे मनःपूर्वक आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed