आताच शेअर करा

दिनांक: २४/०३/२०२६

बांदा : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाचे ज्ञान केवळ पुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोगांच्या माध्यमातून मिळावे, या उद्देशाने सुरू करण्यात आलेला ‘लॅब ऑन व्हील्स’ हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या उपक्रमामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे नवे दालन खुले झाले आहे, असे प्रतिपादन राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री. जे.डी. पाटील यांनी केले.
रिट संस्था, पुणे व उमेद फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील विविध शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना विज्ञानातील विविध प्रयोग प्रत्यक्ष दाखवले जात असून. त्यामुळे विद्यार्थ्यांना विज्ञानातील संकल्पना अधिक सोप्या आणि रंजक पद्धतीने समजण्यास मदत होत आहे.
सध्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुक्यातील निवडक शाळांमध्ये हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. दोडामार्ग तालुक्यातील तळकट नं.१, मोरगाव नं.१, प्राथमिक शाळा झोळंबे, कोलझर हायस्कूल,  तसेच सावंतवाडी तालुक्यातील बांदा नं.१, प्राथमिक शाळा असनिये, घारपी, विलवडे नं.१, डेगवे हायस्कूल व असनिये हायस्कूल या शाळांमध्ये ‘लॅब ऑन व्हील्स’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध विज्ञान प्रयोग दाखविण्यात येत आहेत. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विज्ञान विषयाबद्दलची त्यांची उत्सुकता अधिक वाढताना दिसत आहे.
ग्रामीण भागातील अनेक शाळांमध्ये स्वतंत्र व अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना प्रयोग प्रत्यक्ष पाहण्याची संधी कमी मिळते. ‘लॅब ऑन व्हील्स’ या उपक्रमामुळे ही उणीव मोठ्या प्रमाणात भरून निघत आहे. विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक उपकरणे पाहण्याची, हाताळण्याची तसेच काही प्रयोग स्वतः करून पाहण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्या मनातील जिज्ञासा आणि विज्ञानाबद्दलची आवड वाढत आहे.
या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांशी संबंधित विविध प्रयोग दाखवण्यात येतात.  प्रयोगांच्या माध्यमातून विज्ञान शिकण्याची संधी मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर कुतूहल आणि आनंद स्पष्टपणे दिसून येते.
घारपी येथील प्राथमिक शाळेत या प्रयोगशाळेची सुरवातज्ञ करताना जे.डी. पाटील यांनी सांगितले की, विज्ञान शिकणे म्हणजे केवळ पाठांतर नव्हे, तर निरीक्षण, प्रयोग आणि अनुभवातून ज्ञान मिळवणे हेच खरे विज्ञान शिक्षण आहे. ‘लॅब ऑन व्हील्स’सारखे उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विज्ञान विषय अधिक सोपा आणि रंजक वाटू लागतो.
या कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थ्यांनी  उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी विविध प्रयोग पाहत त्यामागील वैज्ञानिक कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ‘लॅब ऑन व्हील्स’ या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विज्ञान शिक्षणाला नवी दिशा मिळत असल्याचे यावेळी स्पष्ट झाले. या उपक्रमांतर्गत शाळांमधून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयासंबंधी मार्गदर्शन करणेसाठी शिवप्रसाद नाटेकर यांची  मार्गदर्शक शिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.हा उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यत चालू करणेसाठी उमेद‌ फाऊंडेशनचे अध्यक्ष  प्रकाश गाथाडे ,उमेदचे सदस्य ,प्रदिप नाळे,जे.डी.पाटील याचबरोबर उमेदचे सर्व सदस्य व रिट इंडियाचे सर्व पदाधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले.घारपी शाळेत यांचा शुभारंभ करतेवेळी सहकारी शिक्षक मुरलीधर उमरे, आशिष तांदुळे,धर्मराज खंडागळे आदि उपस्थित होते.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या उपक्रमाबद्दल रिट इंडियाचे व उमेद फौंडेशनचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed