
दिनांक: १७/०३/२०२६
मुंबई: गेल्या ५० ते ६० वर्षांतील सर्वात मोठ्या नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांना राज्य सरकार लवकरच मोठा दिलासा देणार आहे. कोकणचे संपूर्ण अर्थकारण आंबा-काजूवर अवलंबून आहे, त्यामुळे सरकार बागायतदारांच्या १०० टक्के पाठीशी असून, सुरू असलेल्या अधिवेशनादरम्यानच मुख्यमंत्र्यांकडून मदतीची मोठी घोषणा केली जाईल,” अशी महत्त्वाची माहिती सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंबा काजू नुकसानीच्या आढावा बैठकीनंतर नितेश राणे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होतेiiबैठकीतील तपशील देताना नितेश राणे म्हणाले की, “कोकणात यंदा आंबा आणि काजू पिकांचे तब्बल ९० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे. असा भीषण प्रकार गेल्या पाच-सहा दशकांत घडलेला नाही. या नुकसानीचा सविस्तर अहवाल राज्य शासनाकडे प्राप्त झाला आहे. या पार्श्वभूमीवर, कॅबिनेटमध्ये मंत्री भरत गोगावले, आदिती तटकरे आणि आम्ही सर्वांनीच ही आक्रमक मागणी लावून धरली होती. त्याप्रमाणे आज मुख्यमंत्र्यांनी तातडीने बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले आहेत.
ते म्हणाले, कोकणातील शेतकरी प्रामाणिकपणे कर्जफेड करतो, त्यामुळे तेथे ‘एनपीए’चे प्रमाण कमी आहे. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन निधीमध्ये प्राधान्य मिळावे, अशी मागणी आम्ही केली आहे. नुकसानीचे तांत्रिक स्वरूप समजून घेण्यासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे अधिकारी आणि संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या बैठकीस उपस्थित होते असेही त्यांनी सांगितले.
कोकणी जनता अनावश्यक मागण्या करत नाही, परंतु निसर्गाच्या कोपामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळणे अपेक्षित आहे, ही भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील या परिस्थितीची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी या बैठकीत आंबा-काजू बागायतदारांसाठी मदतीचा निर्णय घेण्याचे आश्वासन दिले असून, अधिवेशन संपण्यापूर्वीच याची घोषणा केली जाईल, असे सांगत नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांचे विशेष आभार मानले.
कोकणातील शेतकऱ्यांचे या बैठकीकडे बारीक लक्ष होते. आपल्या हक्काच्या लोकप्रतिनिधींनी सरकारदरबारी आवाज उठवावा, ही त्यांची अपेक्षा आज सार्थ ठरल्याचे चित्र दिसत आहे. सरकारच्या या संभाव्य पॅकेजमुळे हवालदिल झालेल्या कोकणी बागायतदाराला मोठी संजीवनी मिळणार असल्याचेही यावेळी मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.
