आताच शेअर करा

दिनांक: २७/०७/२०२६

सातोसे: आषाढी एकादशीचे औचित्य साधून श्री देवी माऊली विद्यामंदिर सातोसे नं. १ शाळेमध्ये अतिशय उत्साही आणि भक्तिमय वातावरणात ‘बालदिंडी सोहळा’ थाटात पार पडला. टाळ-मृदुंगाचा गजर आणि “विठ्ठल रुक्मिणी”च्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
             या सोहळ्यासाठी शाळेतील लहानग्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी पोशाख परिधान केला होता. डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या मुली, तर हातात टाळ, पताका आणि अंगात पांढरा कुडता-धोती परिधान केलेले बालवारकरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. विठ्ठल-रुक्मिणीची सुरेख वेषभूषा केलेल्या विद्यार्थ्यांनी या दिंडीचे विशेष आकर्षण ठरले.ग्रामस्थ, पालक आणि माजी विद्यार्थ्यांचा भरगोस प्रतिसाद मिळाला.
           शाळेतून निघालेल्या या भव्य बालदिंडीत सर्वांनीच हिरिरीने सहभाग घेतला. या सोहळ्याचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे:
पाल्यांचा उत्साह वाढवण्यासाठी बहुसंख्येने पालक उपस्थित होते. गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी दिंडीचे आणि बालवारकऱ्यांचे स्वागत केले.शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत या कार्यक्रमाच्या आयोजनात आणि शिस्तीमध्ये मोलाचे सहकार्य केले.गावच्या प्रथम नागरिक सौ प्रतिक्षा मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ.श्वेता म्हालदार माजी विद्यार्थी श्री.वसंत धुरी, श्री प्रसाद मांजरेकर,श्री काशिनाथ पेडणेकर श्री गणेश सातोस्कर,प्रणय साळगावकर,चैतन्य धुरी, अमोल मांजरेकर, सुजन नागवेकर, ज्येष्ठ नागरिक सुधाकर मांजरेकर श्रीम सुहासिनी बर्डे, शालिनी बर्डे वैशाली सातोस्कर,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला.
           विद्यार्थ्यांनी दिंडी मार्गावर  सुंदर दिंडी नृत्य केले आणि फुगड्यांचा फेर धरला. उपस्थित महिला वर्गाने देखील सहभागी होऊन मुलांचा उत्साह द्विगुणित केला.
       शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम. सीमा पंडित व शिक्षक श्री मुरलीधर उमरे व श्रीम.स्वाती घोडे यांनी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित सर्व पालक, ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांचे मनापासून आभार मानले. अशा उपक्रमांमुळे मुलांवर उत्तम संस्कृती व परंपरेचे संस्कार होतात, अशी भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *