आताच शेअर करा

दिनांक: १६/०३/२०२६

बांदा :  विलवडे आणि वाफोली गावातील क्वारी व क्रशर
व्यावसायिकानी शासनाच्या अटी व नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या भागातील जनतेला नुकसानीसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत महसूल प्रशासनाचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले. मात्र केवळ आश्वासना पलीकडे कोणतीही कार्यवाही होत नसल्याने तीव्र संताप आहे. त्यामुळे या बेकायदा क्वारी व क्रशर बंद न केल्यास मंगळवारी १७ मार्च रोजी या क्वारी व क्रशरच्या मार्गावर  वाफोली आणि विलवडे गावाच्या सीमेवर कालवा रस्ता, सकाळी १० वाजल्यापासून धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा विलवडे ग्रामस्थांनी दिला आहे. 
        सातत्याने अचानक होणाऱ्या मोठ्या आवाजाच्या ब्लास्टिंगमुळे लहान मुले व वृद्धांसह जनावरांचा थरकाप उडतो. तसेच ब्लास्टिंग मुळे घरे व गोठ्यांसह विहिरींना तडे गेल्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या कॉरीवरील भुसुरुंगाच्या स्फोटामुळे तिलारी कालव्यालाही धोका निर्माण झाला आहे. कालव्याच्या गळतीमुळे पाणी शेत जमिनीमधून साचून शेती नापीक बनली आहे. तसेच
क्रशरच्या धुळीच्या साम्राज्यामुळे ग्रामस्थांना प्रदूषणाला सामोरे जावे लागत आहे. बागायती झाडांवर या क्रशरची धूळ पसरून बागायतीचे अतोनात नुकसान होत आहे.
याबाबत उपोषण आंदोलन चिडल्यानंतर तहसीलदार जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठका झाल्या मात्र परिस्थिती जैसे थे आहे. अनेक वेळा संबंधितांसह प्रशासनाचे सातत्याने लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न करण्यात आल्यामुळेच या मार्गावर धरणे आंदोलन छेडण्याची वेळ आल्याचे कृष्णा सावंत आणि विलास सावंत यांच्यासह ग्रामस्थांनी सांगितले.


शासनाचे नियम धाब्यावर बसून या क्वारी व क्रशर सुरू असून याकडे महसूल खाते दुर्लक्ष करीत असल्याचा ग्रामस्थांची तक्रार आहे. क्वारी व क्रशर व्यावसायिकांकडून शासनाच्या नियम व अटींचे उल्लंघन झाल्यामुळे महसूल विभागाने याची तात्काळ दखल घेऊन संबंधितांचे परवाने रद्द करावे यासाठी धरणे आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे ग्रामस्थानी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed